पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या सभेत मशिदीवरील भोंगे याबाबत भूमिका जाहीर केल्यानंतर आरोप प्रत्यारोप यांना सुरुवात झाली आहे. आता राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे उद्या १ मे रोजी जाहीर सभा होणार असून त्याकडे सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष आहे.
तत्पूर्वी आज सकाळी राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाऊ मैदानाची पाहणी केली. या सभेला कितीही विरोध झाला किंवा कितीही केसेस झाल्या तरी त्या आम्ही अंगावर घेण्यासाठी तयार असल्याचे म्हटले.
दरम्यान, ३ तारखेच्या भोंग्याच्या अल्टीमेटमनंतर मनसे आक्रमक होणार असे दिसत आहे. राज्यात कुठल्याही पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास पक्षाकडून वकील दिले जाणार आहेत. मनसेकडे तब्बल दोन हजार वकिलांची फौज तयार असल्याचे बोलले जात आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.
राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी अटीशर्थींसह मान्यता दिली आहे. त्यात आवाजाची मर्यादाही आहे. 50 ते 55 डेसिबलपर्यंत आवाज असावा असे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच उद्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर हजारोंच्या संख्येने पोलीस सुद्धा तैनात असतील.