औरंगाबाद: कोरोनामुळे राज्यात संचारबंदी असताना पोलिसांकडून सर्वसामान्यांना मारहाण होत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत, मात्र औरंगाबादमध्ये पोलिसांनी थेट पत्रकारालाच मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
देवगडहून औरंगाबादला जात असताना मनोज जाधव यांची गाडी अडवण्यात आली. त्यांनी आपण पत्रकार असल्याचं पोलिसांना सांगितलं तसेच सोबतचं आयकार्ड देखील दाखवलं मात्र त्यानंतरही पोलिसांनी त्यांना मारहाण केली. माझं नाव-नंबर पाहा आणि तुला काय करायचं ते कर, अशी अरेरावीची भाषा करत त्यांना शिवीगाळ देखील करण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले.
मारहाण करणारे पोलीस गंगापूर पोलीस ठाण्याचे आहेत. यासंदर्भात गंगापूर पोलीस ठाण्याचे पीआय सुरवसे यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदीचे आदेश आहेत, मात्र पत्रकार अत्यावश्यक सेवांमध्ये येत असल्याने त्यांना वार्तांकनासाठी फिरण्याची मुभा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तसेच आदेश आहेत मात्र औरंगाबाद पोलिसांनी या आदेशाचं उल्लंघन केलं आहे. याप्रकरणी संबंधित पोलीसांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
यापूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलिसांना आवश्यक वस्तू खरेदीसाठी जाणाऱ्या लोकांशी सभ्यतेने वागण्यास सांगितले. आम्ही लोकांना जगण्यापासून रोखत नाही तर काही काळ जीवनशैली बदलण्यास सांगत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना सांगितले.
तसेच आज केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार व डॉक्टर यांना कोणी रोखल्यास कारवाईचे आदेश दिले आहेत. कोरोनाचा सारख्या महामारी विषाणूची आपला जीव धोक्यात घालून जीवाची पर्वा न करणारे पत्रकार आणि डॉक्टर हे समाजाची सेवा करीत आहे. पत्रकारांमुळे देशात काय परिस्थिती आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोहचवितात त्यांना कर्तव्यावर जाणार्याना कोणी रोखल्यास कारवाई केली जाईल, असे माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे पत्रकाराला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होणार का? हे महत्वाचे ठरणार आहे.
It is absolutely wrong that journalists and doctors are asked by societies to vacate their accommodations. They are playing an important role in making people aware about the current #COVID19 situation: Union Minister @PrakashJavdekar #IndiaFightsCorona #21daylockdown pic.twitter.com/DjE0D1OVu8
— PIB India (@PIB_India) March 25, 2020