औरंगाबाद : औरंगाबादेत भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या घरावर दगडफेक झाल्याचा आणखी एक प्रकार घडला. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत कराड यांच्या घरावर शुक्रवारी (21 फेब्रुवारी) हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी घरासमोर उभ्या असलेल्या दोन वाहनांचीही तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सर्वबाबींचा तपास पोलीस करत आहेत.
औरंगाबाद शहरात महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना आणि भाजप या दोन पक्षातील वाद विकोपाला जाऊ लागला आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत कराड यांच्या घरावर शुक्रवारी सायंकाळी राजकीय वैमनस्यातून हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात भागवत कराड यांच्या घरासमोरील दोन वाहने फोडण्यात आल्या. शिवाय, घरावर दगडफेकही करण्यात आली.
या प्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. संतोष सुरे, रंगनाथ राठोड यांना अटक करण्यात आली आहे. तर सचिन जव्हेरी याला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, भाजपमधून नुकतेच शिवसेनेत गेलेल्या किशनचंद तनवाणी यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप भाजपच्या गोटातून करण्यात आला आहे.