औंध (अभिराज भडकवाड)-बाणेर, बालेवाडी, सूस, म्हाळुंगे प्रभाग संदर्भात गेली अनेक महिने परिसरामध्ये जोरदार चर्चा सुरू होती. प्रभाग रचना “लीक’ झाल्यामुळे अनेक जणांनी त्यासंदर्भात कोर्टात देखील तक्रारी दाखल केल्या होत्या. परंतु, आज जाहीर झालेल्या प्रभाग रचनेमुळे परिसरांमध्ये चालू असलेल्या चर्चेला विराम मिळाला.
प्रभाग क्र. 12 औंध, बालेवाडीतील तीन नगरसेवक व प्रभाग क्र. 13 बाणेर, बालेवाडी, सूस, म्हाळुंगे असा दोन नगरसेवकांचा जाहीर झाला. प्रभाग रचनेमध्ये बालेवाडी व औंध एकमेकास जोडले गेले आहेत. भौगोलिकदृष्ट्या एकमेकांपासून ते लांब आहेत तसेच बाणेरची हद्द देखील काही प्रमाणात बालेवाडी औंध प्रभागाला जोडली गेल्यामुळे जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवरून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
बाणेर, बालेवाडी, सूस, म्हाळुंगे प्रभाग अनैसर्गिकपणे तोडण्यात आला आहे. परंतु, प्रभाग अनैसर्गिकपणे तोडण्यात यशस्वी होणारे जनमत जोडण्यात अयशस्वी होणार आहेत.
– अमोल बालवडकर, नगरसेवक
प्रभाग रचना कशाही पद्धतीने झाली तरी मतदार हा विकासाच्या मागे आहे. प्रभागांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकासकामांमुळे बाणेर, सूस, म्हाळुंगे, बालेवाडी तसेच औंध प्रभागांमध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक निवडून येतील.
– ज्योती गणेश कळमकर, नगरसेवक
2017 मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जी प्रभाग रचना करण्यात आली त्याला अनुसरूनच ही प्रभाग रचना करण्यात आली आहे, असे मला वाटते.
– बाबूराव चांदेरे, नगरसेवक
प्रभाग रचना पाहता बाणेर, सूस, म्हाळुंगे, बालेवाडी, औंध प्रभाग हा निश्चितच भारतीय जनता पक्षास अनुकूल झालेला आहे. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत या परिसरातील सर्व नगरसेवक भारतीय जनता पक्षाचेच निवडून येतील.
– लहू बालवडकर, जनसेवक, भाजपा
औंध, बालेवाडी प्रभाग हा पहिल्यापासूनच कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. प्रभाग रचना पाहता या भागामध्ये कॉंग्रेस पक्षाचा मतदार हा मोठ्या प्रमाणात आहे. निश्चितच या भागात पुन्हा कॉंग्रेस पक्षास मतदार निवडून देतील.
– कैलास गायकवाड, माजी नगरसेवक
प्रभाग रचनेमध्ये बालेवाडी औंध प्रभाग क्र.12 मध्ये पहिल्यापासूनच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्राबल्य राहिले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये निश्चितच या प्रभागांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच नगरसेवक असेल.
– डॉ. सागर बालवडकर, उपाध्यक्ष,
राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे शहर