पहिल्याच आठवड्यात बाधितांपेक्षा सुमारे 122% झाले बरे
पुणे – करोनामुळे भीतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या पुणेकरांसाठी ऑगस्ट महिना “लकी’ ठरला आहे. पहिल्याच आठवड्यात शहरात नव्याने सापडलेल्या बाधितांच्या तुलनेत तब्बल 122 टक्के व्यक्ती करोनामुक्त झाले आहेत. आता पर्यंतच्या कालावधीतील सर्वात मोठा आकडा आहे.
शहरात दि.31 जुलै 6 ऑगस्ट कालवधीत सुमारे 8,600 करोनाबाधित सापडले, तर सुमारे 10,537 जण करोनावर मात करून घरी परतले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर आलेला ताण काहीसा कमी झाला असून, पुढील काही दिवसात बरे होणाऱ्यांचे प्रमाण आणखी वाढेल असा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे. शहरात दि.6 ऑगस्टअखेर 62 हजार 27 जणांना करोनाबाधा झाली. त्यातील सुमारे 43,606 रूग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत सुमारे 1,456 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर दि.17 जूनपासून करोनाबाधितांचा दररोजचा आकडा लक्षणीय वाढला होता. ही वाढ दि.26 जुलैपर्यंत कायम होती. त्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे.
बाधित दुपटीचा कालावधी 32 दिवसांवर
शहरातील करोनाबाधित दुप्पट होण्याचा कालावधी आता 32 दिवसांवर गेला आहे. मागील दि.9 ते 29 जून या कालावधीमध्ये हा दर 20 दिवसांचा होता. तर, शहरातील बाधितांच्या संख्येचा आलेख गेल्या आठवड्यापासून खाली येत आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
शहरात करोनाचा पहिला बाधित सापडल्यानंतर दि.9 मार्च ते 9 जून या कालावधीत बाधितांची एकूण संख्या केवळ 8,205 होती. या काळात शहरातील बाधित दुपटीचा कालावधी 13 दिवसांवर होता. तर, करोनाची साखळी तोडण्यासाठी हा कालावधी 28 दिवसांपर्यंत जाणे अपेक्षित होते. मात्र, शहरात जसजसा लॉकडाऊन शिथिल होत गेला, तसा बाधितांचा आकडा वाढतच गेल्याने हा कालावधी फारसा वाढला नव्हता. मात्र, मागील आठवड्यापासून शहरातील बाधितांची संख्या कमी होत आहे.