आमदार लक्ष्मण जगताप यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी – करोना काळात पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील अनेक खासगी नॉन कोविड रुग्णालयांनी रुग्णांची प्रचंड आर्थिक लूट केलेली आहे. सरकारने निश्चित केलेल्या उपचार खर्चाव्यतिरिक्त रुग्णांकडून अवास्तव बिले वसूल करण्यात आली आहेत. त्यामुळे दोन्ही शहरातील सर्व खासगी नॉन कोविड रुग्णालयांनी वसूल केलेल्या बिलांचे ऑडिट करावे. जादा बिलांची सर्वसामान्यांना परतफेड करावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी आरोग्यमंत्री टोपे यांना पत्र पाठविले आहे. त्यानुसार, करोना आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्यानंतर पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयांना करोना रुग्णांवर उपचाराची परवानगी देण्यात आली. त्यानुसार अनेक रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयांमध्ये करोना रुग्णांवर उपचार सुरू केले. त्यावेळी सरकारने करोनासह इतर आजारांवरही रुग्णांकडून किती उपचार खर्च घ्यायचा, याचे आदेश काढले. त्यामध्ये करोनासह इतर सर्व आजारांवरील उपचार खर्चाचे दर निश्चित करण्यात आले आहेत.
सरकारच्या अधिसूचनेनुसारच रुग्णांना बिल आकारण्याचे सर्व खाजगी नॉन कोविड रूग्णालयांना आदेश देण्यात आले होते. परंतु, या आदेशाला पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील बहुतांश खासगी नॉन कोविड रुग्णालयांनी धाब्यावर बसविल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. बहुतांश सरकारी रुग्णालयांमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आल्याने गोरगरीब रुग्णांनी इतर आजारांच्या उपचारासाठी खासगी नॉन कोविड रुग्णालयांना प्राधान्य दिले होते.
मात्र या खासगी नॉन कोविड रुग्णालयांनी उपचाराच्या नावाखाली प्रचंड आर्थिक लूट केलेली आहे. इतर आजाराच्या रुग्णांकडून सरकारने ठरवून दिलेल्या उपचार खर्चानुसार बिले घेण्यात आलेली नाहीत. सरकारच्या आदेशालाही न जुमानणाऱ्या या खासगी नॉन कोविड रुग्णालयांना वठणीवर आणण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. त्यामुळे या बिलाचे ऑडिट करावे, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.