चार मार्चला 16 कोटींची रक्कम वसूल होणार
थेऊर -हवेली तालुक्यामध्ये सातबारा मिळकतीवरील बिनशेती सारा थकवणे, त्याचप्रमाणे अनधिकृत गौणखनिजनुसार एकूण येणे असलेल्या रकमेच्या वसुलीपोटी काही मिळकती 7/12 दफ्तरी महाराष्ट्र शासन जमा झाल्या आहेत. जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने प्रस्तुतच्या मिळकतीचा जाहीर लिलाव दि. 4 मार्चला करण्यात येणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली आहे. यामध्ये नामांकित बड्या धेंडाचा समावेश आहे. हवेलीतील जाहीर लिलाव प्रक्रियेतून शासनाला सुमारे सोळा कोटी रुपयांची महसूल वसुली होणार आहे. संबंधित नोटिसधारकांना दि. 3 मार्चपूर्वी ही रक्कम गावकामगार तलाठी यांच्याकडे जमा करण्याची अंतिम लेखी नोटिस बजावण्यात आली आहे.
हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी काही दिवसांपूर्वी तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, कारकून व सर्व मंडलाधिकारी, गावकामगार तलाठी यांची बैठक घेऊन महसूल वसुलीविषयी चांगलीच कानउघाडणी केली. आठ मंडल कार्यक्षेत्रातील प्रत्येक सजाप्रमाणे झाडाझडती घेतली होती. वसुलीबाबत व इतर प्रलंबित कामांबाबत कडक सूचना बैठकीमध्ये दिल्या होत्या. त्यामुळे शासनाच्या वाढीव महसूल वाढीचे उद्दिष्ट सफल होण्याची चिन्हे आहेत.
हवेली तालुक्यात गौणखनिज उत्खनन व वाहतुकीमध्ये झालेल्या दंडात्मक कारवाईचा दंड संबधित व्यक्तींनी न भरल्यास त्याबाबत संबंधितांच्या सातबारावरील मिळकतीमध्ये इतर हक्कामध्ये प्रस्तुतचा दंडात्मक बोजा नोंदवण्याकामी तलाठी व मंडलाधिकारी यांना तालुका तहसील कार्यालयातून सूचित केले होते.
त्यातच संबंधितांना नोटीस बजावूनही त्यांनी शासकीय थकबाकी न भरल्यामुळे संबंधितांची सातबारावरील नावे कमी करुन मिळकतीवर महाराष्ट्र शासन नाव दाखल झालेले आहे. याकामी प्रस्तुतच्या मिळकतधारकांना वेळोवेळी नोटीसा बजावल्या होत्या. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही थकबाकी न भरल्यामुळे पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी दिलेली आहे.
लिलाव प्रक्रियेला न्यायालयात आव्हान
सातबारावरील इतर हक्कामध्ये शासकीय थकबाकी असताना बेकायदेशीर हस्तांतरित व्यवहार होत असल्याने हस्तांतरित व्यवहाराला अटकाव करण्यासाठी संबंधित मिळकतीवर महाराष्ट्र शासन नाव दाखल होणार आहे. त्यामुळे महसूल वसुलीमध्ये मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत. या निर्णयाचा धनदांडग्यांनी धसका घेतला आहे. हवेलीतील भिवरी, वाडेबोल्हाई, शिरसवडी, महमंदवाडी, नऱ्हे, खराडी, कोंढवा बुद्रुक, वाघोली, गुजर निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, कात्रज, मांगडेवाडी व वडगाव ब्रुद्रुक येथील सजामधील मिळकतीचा शासकीय थकीत करापोटी दि. 4 मार्चला हवेली तहसील कार्यालयात लिलाव होणार आहे. काहींनी या प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिले असून जाहीर लिलाव प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.