39 लाख 45 हजार रुपये जमा : इनोव्हाला मिळाले सर्वाधिक 9 लाख 30 हजार रु.
पुणे – बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी ऊर्फ डीएसके प्रकरणात ठेवीदार आणि बॅंकांची देणी परत देता यावी, यासाठी डीएसके यांच्या नऊपैकी सहा वाहनांचा लिलाव शनिवारी करण्यात आला. त्या लिलावातून 39 लाख 45 हजार रुपये मिळाले. त्यात सर्वाधिक किंमत टोयोटा कंपनीच्या इनोव्हा या वाहनाला मिळाली. त्या वाहनाचा 9 लाख 30 हजार रुपयांना लिलाव करण्यात आला. तर सर्वात कमी किंमत टोयोटा कंपनीच्या क्वालिस या चारचाकी वाहनास मिळाली. तिची तीन लाख पाच हजार रुपयांना विक्री झाली.
मावळ प्रांत संदेश शिर्के यांनी ही प्रक्रिया पार पडली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. आय. शेख आणि तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यावेळी उपस्थित होते. लिलाव सुरू झाल्यानंतर तासाभरातच पाच वाहनांचा लिलाव झाला. लिलावाच्या पहिल्या प्रक्रियेत नऊपैकी पाच वाहनांची विक्री झाली.
त्यामुळे विक्री न झालेल्या वाहनांची खरेदी करता यावी, म्हणून वाहन घेण्यासाठी आलेल्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. त्यात टोयोटा कंपनीच्या क्वालिस गाडीचा लिलाव झाला. 26 लाख 64 हजार रुपये किंमत असलेली ऑगस्टा कंपनीची दुचाकी देखील लिलावामध्ये ठेवण्यात आली होती. या दुचाकीवर मात्र कोणीही बोली लावली नाही.