समस्तीपूर : बंगळुरूमध्ये आत्महत्या केलेल्या एआय इंजिनीअर अतुल सुभाष यांचा 4 वर्षांचा मुलगा व्योम त्याची आई निकिता सिंघानियासोबत राहणार आहे. मंगळवारी सुप्रीम कोर्टाने अतुलची आई अंजू देवी यांना मुलाचा ताबा देण्यास नकार दिला. व्योमची आजी अनोळखी आहे. अशा स्थितीत त्यांना मुलाचा ताबा देता येणार नाही, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.
व्योम त्याची आई निकिता सिंघानियासोबत आहे. निकिता, तिची आई आणि भावाला शनिवारी बंगळुरू न्यायालयाने जामीन मंजूर केला. यानंतर निकिताने तिचा मुलगा व्योम याला फरीदाबादच्या बोर्डिंग स्कूलमधून बोलावले होते. अतुलची आई अंजू देवी यांनी नातवाच्या ताब्यासाठी सुप्रीम कोर्टात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. कोर्टाने हरियाणा सरकार आणि अतुलच्या पत्नीकडून मुलाच्या सद्यस्थितीबाबत प्रतिज्ञापत्र मागवले आहे. पुढील सुनावणी 20 जानेवारीला होणार आहे.
निकिताच्या वकिलाने सुप्रीम कोर्टात सांगितले की, आता मूल निकिताकडे आहे. शनिवारी जामीन मिळाल्यानंतर तिने फरिदाबाद येथील शाळेतून मुलाला स्वतःकडे आणले. निकिताला दर शनिवारी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर व्हावे लागते. त्यामुळे ती मुलासोबत बंगळुरूला जाणार आहे. मुलाला त्याच शाळेत प्रवेश मिळेल.
सुप्रीम कोर्टाने पुढे म्हटले की, आई ताब्यात असल्याने या याचिकेवर नोटीस बजावण्यात आली आहे. आता ती बाहेर आली असून, मुलाचा ताबा घेण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवर सुनावणी करण्यात काही अर्थ नाही. असे असले तरी मूल त्याच्या आजीच्या संपर्कात नाही. आजी त्याच्यासाठी अनोळखी आहे.