Atul Parchure : चित्रपटसृष्टीच नव्हे तर नाट्य विश्वात देखील मोलाचं योगदान देणारे जेष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं मागील आठवड्यात निधन झालं आहे. गेल्या वर्षीच ते कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून काही प्रमाणात बरे झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी काम सुरू केलं होतं.
पण सोमवारी 14 ऑक्टोबर रोजी अतुल परचुरे यांनी वयाच्या 57 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एक ताकदीचा अभिनेता, विनोदी अभिनेता आणि माणूस म्हणून उत्तम व्यक्ती अशी अतुल परचुरे यांची ओळख होती.
अतुल परचुरे यांचे अनेक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींशी सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या अश्या अचानक जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक मराठी नाटकांमधील आपल्या भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं.
त्यांनी साकारलेल्या पुलंच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. अतुल परचुरे यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला असून, न भरुन निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, अतुल परचुरेंच्या निधनावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अतुल परचुरे यांच्या पत्नी सोनिया परचुरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी परचुरे कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे. ट्विट करत त्यांनी हे पात्र शेअर केलं आहे.
पंतप्रधान मोदींचं सोनिया परचुरेंना पत्र….
अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर प्रचंड दुःख झालं. ही पोकळी कधीही भरुन न निघणारी आहे. ते सिनेइंडस्ट्रीतील अष्टपैलू अभिनेते होते. शिवाय मराठी आणि हिंदी सिनेविश्वातील त्यांच्या अमुल्य योगदानाला कधीही विसरता येणार नाही.
त्यांचं विनोदाचं टायमिंगही कमाल होतं. त्यांच्या कामामुळे ते कायमच आपल्या स्मरणात राहतील. अतुल परचुरे यांचं कार्य आणि विचार कायम कुटुंबाला प्रेरणा देत राहील. या कठीण प्रसंगी कायम त्यांच्यासोबत घालवलेला वेळ आणि आठवणी हा कुटुंबासाठी आधार आहे.
त्यांनादेखील कुटुंबाची, मित्रांची आणि चाहत्यांची आठवण येत असेल… पण ते कायम आपल्या हृदयात असतील. शिवाय या कठीण काळात देव त्यांच्या कुटुंबियांनी शक्ती देवो… असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतुल परचुरे यांना श्रद्धांजली वाहिली.