पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले भाजप कार्यकर्ते
कराड – पूरग्रस्तांना सावरण्यासाठी आणि पुरात उद्धवस्त झालेल्या नागरिकांचा संसार उभारण्यासाठी कराड तालुक्यातील अतुल भोसले युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सरसावले आहेत. युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून कराड शहर व ग्रामीण भागात पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. आपल्या कार्यातून युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जणू माणुसकीचा महापूलच उभा केला आहे.
महापुरात अडकलेल्या कुटुंबांना आधार देण्याचा प्रयत्न अतुल भोसले युवा प्रतिष्ठानने सुरू केला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तांदूळ, गहू, तेल, तूरडाळ, चहा पावडर, साखर, बिस्कीट पुडे, मीठ, हळद अशा जीवनावश्यक वस्तूंचा बॉक्स तयार केला आहे.
पुरात अडकलेल्या, तसेच पूर ओसरल्यानंतर आपापल्या घराकडे परतलेल्या कराड शहर व ग्रामीण भागातील पूरग्रस्त नागरिकांपर्यंत हे जीवनावश्यक साहित्य पोहचविण्यासाठी युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सरसावले आहेत. कार्यकर्त्यांकडून हे साहित्य गावोगावी जाऊन पूरबाधितांपर्यंत पोहचविले जात आहे.
कराड शहरातील प्रीतिसंगम घाट परिसर, पाटण कॉलनी, पत्रा चाळ, बालाजी मंदिर परिसर, मुजावर वाडा, रुक्मिणीनगर परिसरात नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, सौ. विद्या पावसकर, मुकुंद चरेगावकर, हर्षवर्धन मोहिते, महादेव पवार, उमेश शिंदे, अनिकेत मोहिते, स्वाती पिसाळ यांच्या हस्ते बॉक्स वितरित करण्यात आले. आगाशिवनगर भागात हणमंतराव जाधव, दिनेश रैनाक, दिलीप जाधव, तानाजी देशमुख यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. आटके, दुशेरे, कार्वे, कोडोली, शेरे, खुबी, कापील, पाचवडवस्ती, गोळेश्वर, चचेगाव आदी गावांमध्येही मदत पोहोचविण्यात आली. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या या मदत अभियानामुळे कराड तालुक्यातील पूरग्रस्तांना दिलासा मिळत आहे.