कराड – राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार व राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे आपला उमेदवारी अर्ज आज (गुरुवारी) दाखल करणार आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची कराड येथे विजयी संकल्प रॅली व प्रचार सभाही होणार आहे. अशी माहिती संयोजकांनी दिली आहे.
आ. चव्हाण गुरुवारी सकाळी अकरा वाजता कराडमधील नूतन प्रशासकीय इमारतीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आ. चव्हाण व प्रमुख मान्यवरांसमवेत दुपारी 3 वाजता दत्त चौक येथून विजयी संकल्प रॅलीस प्रारंभ होईल.
यावेळी छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर रॅली मुख्य बाजारपेठमार्गे आझाद चौक, चावडी चौक, कन्या शाळा, जोतिबा मंदीर, डॉ. आंबेडकर पुतळा मार्गे कराड नगरपालिकेजवळ पोहचेल. येथे सायंकाळी 6 वाजता जाहीर प्रचार सभा होणार आहे. यावेळी तालुक्यातील मतदार व कॉंग्रेस आघाडी व मित्रपक्षाचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.