मुंबई – हिवाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात काल चांगलीच खडाजंगी झाली. विरोधकांकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी झाल्यानंतर सभागृहात दिशा सालियनचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आल्याचे पाहायला मिळाले. अशात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचयवर विधानसभा अध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली. यानंतर विरोधकांना सभात्याग करत जोरदार निषेध नोंदवला. यावेळेसचाच एक फोटो ट्विट करत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
हा खरा ‘निर्लज्जपणा’…विधानसभा अध्यक्षांचा सन्मान न राखल्यामुळे निलंबित केलेल्या जयंत पाटलांना खांद्यावर घेणे म्हणजे विरोधकांनी लोकशाहीची, संविधानाची तिरडी खांद्यावर घेण्यासारखी आहे.” अशा आशयाचे ट्विट भातखळकर यांनी केले आहे. जयंत पाटील यांना काल राष्ट्रवादीच्या आमदारांनी खांद्यावर उचलून घेतले होते त्यावेळेसचा फोटो देखील ट्विटमध्ये पाहायला मिळतो.
निर्लज्ज असा शब्दप्रयोग केल्याचा ठपका ठेवत जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले. यानंतर सभागृहाबाहेर येताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषबाजी केली. सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करत राष्ट्रवादीच्या इतर आमदारांनी पाटील यांना थेट खांद्यावर उचलून घेतले. त्यावरूनच भातखळकर यांनी विरोधकांवर टीका केल्याचे दिसून आले.