जुन्नर – तालुक्यात सध्या करोनाबाधित रुग्णसंख्या वाढतेय या पार्श्वभूमीवर लेण्याद्री कोविड केअर सेंटर याठिकाणी आज आमदार अतुल बेनके यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्य यंत्रणेची संवाद साधून पाहणी केली.
लेण्याद्री कोविड सेंटरचे प्रमुख आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच रुग्णांशीही संवाद साधला. याठिकाणी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचाही यावेळी त्यांनी आढावा घेतला.
या पाहणीदरम्यान बेनके यांच्यासमवेत तहसीलदार हनुमंत कोळेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, भाऊसाहेब देवाडे, लेण्याद्री देवस्थानचे सचिव जितेंद्र बिडवई उपस्थित होते.
मी तालुक्यातील सुजाण जनतेला आवाहन करतो की, सध्या एकीकडे लसीकरण चालू आहे. परंतु तरीही करोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंग चा वापर करावा व प्रशासनास सहकार्य करावे.
– अतुल बेनके, आमदार, जुन्नर