जुन्नर तालुक्यावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीची सत्ता
हितेंद्र गांधी/जुन्नर: जुन्नर विधानसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अतुल बेनके यांनी ७४ हजार ९५८ मते मिळवत विजयाची नोंद केली आहे. अतुल बेनके यांनी सेनेचे उमेदवार व विद्यमान आमदार शरद सोनवणे यांना ९ हजार १६२ मतांनी पराभूत केले. सोनवणे यांना ६५ हजार ८९० मते मिळाली तर तिसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार आशाताई बुचके यांना ५० हजार ४१ मिळाली.
लेण्याद्री येथे झालेल्या मतमोजणीत अतुल बेनके यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत अतुल बेनके यांनी २ हजार २९६ मते मिळवत आघाडी घेतली व ती शेवटच्या फेरीपर्यंत टिकवून ठेवली होती. एकूण झालेल्या २६ फेऱ्यांपैकी सोनवणे यांनी तिसऱ्या, आठव्या, तेराव्या व चौदाव्या फेरीत आघाडी घेतली. मात्र इतर सर्व फेऱ्यांमध्ये बेनके यांनी निर्णायक आघाडी घेत विजय संपादन केला.
मतमोजणीप्रसंगी लेण्याद्री यात्रा निवासच्या बाहेर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. याप्रसंगी पोलिसांचा मोठा फौजफाटा असल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. अतुल बेनके यांचे नाव घोषित होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ढोल-लेझीम व बेंजोच्या तालावर कार्यकर्त्यांनी व नेत्यांनीही ठेका धरला होता. तालुक्यातील ३५६ मतदान केंद्रांपैकी १३९ क्रमांकाच्या बूथवरील निकाल जाहीर करण्यास तांत्रिक बिघाडामुळे उशीर झाला.
- बेनके यांच्या विजयाची प्रमुख कारणे-
- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा.
- खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा दांडगा संपर्क.
- विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड. संजय काळे यांची मिळालेली साथ.
- शिवसेनेच्या मतविभाजनाचा फायदा.
- राष्ट्रवादीच्या सर्व थरातील कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे राबविलेली प्रचार यंत्रणा.