निमगाव सावा येथील कार्यक्रमात अतुल बेनके यांचे वक्तव्य
अणे – शरद पवार मुख्यमंत्री होणार असतील तर त्यांच्यासाठी मी जुन्नर तालुक्याचा आमदारकीचा राजीनामा देईन, असे जुन्नर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार अतुल बेनके म्हणाले. निमगाव सावा येथील जेपीएलच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. शरद पवार हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी जनतेची इच्छा आहे. तसेच शरद पवार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे एकमेव नेते आहेत.
काहीही झालं तरी ते कुणापुढे झुकणारे नाहीत. जुन्नर तालुका ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे. जर पवार साहेबांना महाराष्ट्राच्या तक्तावर बसण्याची संधी जर मिळाली तर मी आमदारकीचा राजीनामा देईल व महाराष्ट्रातून त्यांनी जुन्नरचे आमदार पद स्वीकारावं अशी माझी इच्छा आहे.
पवारांनी जुन्नरचे आमदारपद स्वीकारावे
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री पांडुरंग स्पोर्टस क्लब, संकल्प युवा ग्रुप व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, समस्त ग्रामस्थ निमगाव सावा आयोजित जेपीएल टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. अटीतटीच्या अंतिम सामन्यात शिवसागर लिजेंट जुन्नर यांनी विजयश्री खेचून आणला तर धर्मनाथ स्पोर्टस क्लब साकोरी युनिक परांडा हा संघ उपविजेता ठरला.
या बक्षीस वितरणाला आमदार वळसे पाटील, अतुल बेनके, माजी आमदार पोपटराव गावडे, सत्यशिल शेरकर, किशोर दांगट, देवदत्त निकम, गणपत फुलवडे, पांडुरंग पवार, मोहित ढमाले, दिनेश दुबे, भानुदास हाडवळे, जेपीएल चे अध्यक्ष परेश घोडे व असंख्य क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.