पुणे – ज्येष्ठ महिन्यातील गणेश जन्मानिमित्त ग्रामदैवत श्री कसबा गणपतीला आकर्षक सजावट केली होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या भाविकांसोबत शारीरिक अंतर पाळून गणेशजन्म संपन्न झाला.
ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थानच्या वतीने गणेश मंदिरात परंपरेनुसार रात्रीही “श्रीं’ची महाआरती, छबिना करून गणेशजन्म सोहळा साजरा करण्यात आला. आशापूरक ऊर्फ प्रमोद ठकार यांनी गणेशाची पूर्ण पोषाखाने पूजा साकारली. यावेळी मंदिराचे प्रमुख विश्वस्त विनायक ठकार, शरदचंद्र ठकार, शैलजा ठकार यांनी मार्गदर्शन केले. गणरायासमोर आंबे, कलिंगड, केळ आदी फळे मांडण्यात आली होती. याशिवाय चाफा, मोगरा, जरबेरा, गुलछडी, बिजली, झेंडू आदी फुलांची आकर्षक आरास आणि विद्युत रोषणाईदेखील केली होती.
मुद्गल पुराणात आलेल्या उल्लेखात असे म्हटले आहे, की ज्येष्ठ गणेश जन्म म्हणजेच शेषपुत्र मूषकग जन्म हा अंगारकी चतुर्थीस झाला होता आणि योगायोगाने ज्येष्ठ शुद्ध अंगारकी चतुर्थी यंदा एकाच दिवशी आल्याने हा दुर्मिळ योग साधत गणेशाला फुलांची पोशाख पूजा करण्यात आली.