लक्षवेधी: व्हॉट्‌सऍप हॅकिंगमागचे गौडबंगाल काय?

स्वप्निल श्रोत्री

आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक हे हॅकिंगला युद्धाचा एक नवीन पर्याय म्हणून पाहतात व त्याची गणना “हायब्रीड वॉरफेअर’ मध्ये करतात. अशा युद्धापासून देशाचे संरक्षण करण्यासाठी देशातील सुरक्षा यंत्रणा कायमच प्रयत्नशील असतात. परंतु, सर्वच त्यांच्या माथी मारून निश्‍चिंत राहणे सुद्धा योग्य नाही. आपल्यावर नकळत कुणाची नजर तर नाही ना हे पाहणे आपली जबाबदारी आहे आणि त्यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे.

एकीकडे तंत्रज्ञानात प्रगती होत असताना त्याचे नव्याने धोकेही समोर येऊ लागले आहेत. ऑनलाइन फसवणूक, ब्लॅकमेलिंग ह्या सारख्या घटना आपणास नवीन नाहीत; परंतु आता एक पाऊल पुढे जाऊन तंत्रज्ञान क्षेत्रातील गुन्हेगारांनी दहशतवादाचा नवा मार्ग अवलंबिला आहे.

2017 मध्ये असेच एक प्रकरण संपूर्ण जगावर घोंगावून गेले. त्यात केंब्रिज ऍनालिटीका व तिचा प्रवर्तक अलेक्‍झांडर कोगन यांनी रशियासाठी फेसबुकच्या माध्यमातून अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका हॅक केल्याचा आरोप करण्यात आला होता. केंब्रिज ऍनालिटीकाच्या नावाने उठलेली वावटळ संपते न संपते तोच भारताच्या संसदेत स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण घराची रेकी करण्यात आल्याच्या प्रकरणाने वातावरण गरम केले. काही दिवसांपूर्वी येमेनमधील हौथी या इराण पुरस्कृत दहशतवादी गटाने सौदी अरेबियाच्या तेल विहिरींवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ले केले. हे हल्ले इतके मोठे होते की सौदीची संपूर्ण सुरक्षा यंत्रणा भेदून तब्बल 45 किलोमीटर आत जाऊन विस्फोट करण्यात आले आणि पुढील 7 दिवस सौदीला आपले तेल उत्पादन निम्म्याने कमी करावे लागले.

सध्या असेच एक प्रकरण गेले आठ-दहा दिवस सर्वत्र चर्चेत होते ते म्हणजे व्हॉट्‌सऍप हॅकिंगचे. सोशल मीडियातील आघाडीची कंपनी असलेल्या व्हॉट्‌सऍपने सॅन फ्रॉन्सिस्को अमेरिकेतील फेडरल न्यायालयात इस्राईलच्या एन. एस. ओ. ग्रुप विरोधात जगभरातील 1 हजार 400 व्हॉट्‌सऍप धारकांचे अकाउंट हॅक केल्याची तक्रार गेल्या 29 ऑक्‍टोबर रोजी दाखल केली. हॅक करण्यात आलेल्या अकाउंटपैकी साधारण दोन डझनच्या आसपास भारतीय नागरिकांची अकाउंट असल्याची माहिती समोर आल्याने साहजिकच भारतात गदारोळ माजला. अनेक वृत्तवाहिन्यांनी “स्पेशल शो’ करून ह्या गोंधळात अधिकच भर घातली. भारतातून हॅक करण्यात आलेली अकाउंट ही कोणाची आहे त्यासंबंधीची कोणतीही माहिती आपणाकडे सध्या उपलब्ध नाही. परंतु, हाती आलेल्या माहितीनुसार ह्यात प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, सामाजिक चळवळीतील लोक असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी समोर आले आहे. पुढे अमेरिकेच्या न्यायालयात खटला सुरू झाल्यावर सर्व गोष्टींचा खुलासा होईल तोपर्यंत प्रतिक्षा करणेच योग्य असेन.

परंतु, मला एक गोष्ट येथे सांगायची आहे की, ज्या एन. एस. ओ. ग्रुप विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे तो ग्रुप ही सर्व कामे उघडपणे करतो. एन. एस. ओ. गृपने आजपर्यंत हॅकिंग करीत असल्याचे कधीही नाकारले नाही. किंबहूना त्यांनी हे जाहीर केले आहे की, आम्ही हे काम फक्‍त विविध देशांमधील सरकार व त्यांच्या तपास यंत्रणा यांच्यासाठी करतो. कोणत्याही व्यक्‍ती, खासगी संस्था किंवा संघटना यांच्यासाठी नाही. त्यामुळे एन. एस. ओ. गृपने हॅक केलेले व्हॉट्‌सऍप अकाउंट हे त्यांनी आपल्या मनाने किंवा व्यक्‍ती संस्था यांच्या सांगण्यावरून केल्याची शंका अजिबात नाही किंबहुना यापूर्वी सुद्धा त्यांनी असे केल्याचे ऐकिवात नाही. शिवाय एन. एस. ओ. ग्रुप आपली हॅकिंगची सेवा पुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे चार्ज करते. उदा. 2015च्या करारानुसार घाना, आफ्रिकाच्या सुरक्षा यंत्रणांना एक वर्षासाठी 8 दशलक्ष डॉलर चार्ज करण्यात आले होते.

तर मेक्‍सिको, उत्तर अमेरिकाच्या सुरक्षा यंत्रणांना 2011 ते 2017 साठी 80 दशलक्ष डॉलरचे बील देण्यात आले होते. एवढी मोठी बिले बनविणे हे कोणत्याही व्यक्‍ती किंवा खासगी संस्थांना शक्‍य नाही. त्यामुळे ही 1 हजार 400 व्हॉट्‌सऍप अकाउंट हॅक करण्यामागे कोणत्या एका देशाचे सरकार आहे की वेगवेगळ्या देशातील सरकार यात सहभागी आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. भारत सरकारने व्हॉट्‌सऍपला याबाबत खुलासा मागितला होता, व्हॉट्‌सऍपकडून उत्तर येणे अपेक्षित आहे. व्हॉट्‌सऍपचा डेटा व त्याच्या सुरक्षेसंदर्भात सध्या एक खटला भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असून व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून सुरक्षेचे जे दावे सर्वोच्च न्यायालयात करण्यात आले होते त्याचे धिंडवडे मात्र ह्या एन. एस. ओ. ग्रुपने उडविले आहेत.

विविध वर्तमानपत्रे व वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून व्हॉट्‌सऍपला व इतर सोशल माध्यमांच्या सुरक्षेसंबंधी चर्चा आपण ऐकल्या व वाचल्या असतील.

काही ठराविक गोष्टींची काळजी घेऊन आपण हॅकिंगपासून सहज वाचले जाऊ शकतो.

1) आपल्या संगणक, लॅपटॉप, मोबाइल किंवा इतर उपकरणांमध्ये चांगल्या दर्जाचा “अँटीव्हायरस’ जरूर इनस्टॉल केलेला असावा व तो वेळोवेळी अपडेट करावा.
2) मोबाइलवर आणि ई-मेलवर येणाऱ्या व नको असलेल्या लिंक्‍स उदा. तुमचे क्रेडिट कार्ड डिस्पॅच झाले आहे, माहिती बघण्यासाठी येथे क्‍लिक करा, लॉटरीचे बक्षीस घेण्यासाठी येथे क्‍लिक करा व इतर यांसारख्या लिंक्‍स वर कधीही क्‍लिक करू नका.
3) माहीत नसलेल्या नंबर/नाव यावरून येणारे भावनिक ई-मेल व मेसेजकडे दुर्लक्ष करा.
4) प्ले-स्टोअरवरून कोणतेही ऍप डाउनलोड करताना ते अधिकृत आहे याची खात्री करा.
5) अनोळखी नंबरवरून येणारे मिस कॉल विशेषतः आंतरराष्ट्रीय कॉल कधीही रिसिव्ह अथवा कॉलबॅक करू नका.
6) फेसबुक इंस्टाग्राम वरून येणारी अनोळखी व्यक्‍तीची’ फ्रेंड रिक्वेस्ट’ शक्‍यतो एक्‍सेप्ट करू नका.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)