इच्छुकांचे सरपंच आरक्षण सोडतीकडे लक्ष

पारनेर तालुक्‍यातील 88 ग्रामपंचायतींचा सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर 

शशिकांत भालेकर
पारनेर  -पारनेर तालुक्‍यातील 88 ग्रामपंचायतींच्या सदस्यमंडळाची मुदत संपलेली आहे. या ग्रामपंचायतींत सध्या प्रशासक काम पाहात आहेत. करोनामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. मात्र सध्या या निवडणुकांबाबत प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. त्यानुसारच तालुक्‍यातील सरपंचपदांचे आरक्षण सोडत कार्यक्रम 15 डिसेंबर रोजी होणार आहे.

तालुक्‍यातील इच्छुक उमेदवारांचे डोळे सध्या आरक्षण सोडतीकडे आहेत. सरपंचपदाबाबत काय आरक्षण निघते, यावरच गावपुढाऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यानुसार रणनीती आखली जाणार आहे. तालुक्‍यात एकूण 114 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी 88 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने 88 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. हा सोडत कार्यक्रम 15 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली. या ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जातीसाठी 6 जागा राखीव आहेत.

त्यापैकी तीन व्यक्ती व तीन महिला असणार आहेत. अनुसूचित जमातींसाठी 6 जागा राखीव आहेत. त्यात तीन महिला व तीन व्यक्तींसाठी राखीव आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 31 जागा राखीव असून, त्यात 15 व्यक्ती व 14 महिलांसाठी जागा राखीव आहेत. नागरिकांचा खुला प्रवर्गासाठी 71 जागा राखीव आहेत. त्यामध्ये 35 व्यक्ती व 36 महिलांसाठी राखीव आहेत. ज्या ठिकाणी सरपंचपद सर्वसाधारण व्यक्तींसाठी खुले असेल, तेथे मोठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. महिलांसाठी राखीव होणार तेथे गावातील पुढारी व इच्छुक उमेदवार पत्नीला सदस्यपदासाठी पुढे करू शकतात. मागासवर्गीय आरक्षण असलेल्या ठिकाणी मर्जीतील उमेदवाराचा शोध घेतला जाईल. आरक्षणानंतर या सर्व गोष्टी गावपातळीवर सुरू होतील.

राजकीय पक्षही लागले तयारीला
अनेक दिवसांपासून सरपंचपदावर डोळे लावून बसलेल्या इच्छुक उमेदवारांना आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आपल्या गावात काय आरक्षण निघते, याची उत्सुकता लागली आहे. तालुक्‍यात सर्वच राजकीय पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांना सरपंचपदासाठी पुढे करणार आहेत. त्यादृष्टीने व्यूहरचना आखली जाणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर गावपातळीवरील निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.