– डॉ. रिता शेटिया
2025च्या केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या अपेक्षांमध्ये औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी भरीव निधी, कर सवलत, पायाभूत सुविधा सुधारणा, कृषी क्षेत्रावर भर, गुंतवणूक-केंद्रित वाढ आणि रिअल इस्टेट उद्योगाला बळकटी देण्यासाठी उपाययोजनांचा समावेश आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पाकडून प्रत्येक राज्याला अपेक्षा आहेत तशाच अपेक्षा महाराष्ट्र राज्य आणि जनतेच्याही आहेत.
कर सवलती : 2023 नुसार पाहिले तर देशाच्या जीडीपीमध्ये (15.7 टक्के वाटा) महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर होते. महाराष्ट्र हे भारतातील दुसर्या क्रमांकाचे औद्योगिक राज्य आहे जे राष्ट्रीय औद्योगिक उत्पादनात 20 टक्के योगदान देते. जीएसडीपीमध्ये जवळजवळ 46% टक्के योगदान उद्योगांकडून मिळते. महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये सॉफ्टवेअर पार्क आहेत आणि महाराष्ट्र सॉफ्टवेअरचा दुसरा सर्वात मोठा निर्यातदार आहे ज्याची वार्षिक निर्यात 80 हजार कोटींपेक्षा जास्त आहे.
त्यामुळे कर मोठ्या प्रमाणात भरणार्या उद्योग क्षेत्रासाठी करप्रणाली सुलभ करण्यासाठी कर सुधारणा करायला हव्यात. अनेक उद्योगांकडून करसवलती आणि जीएसटी सूट मिळण्याची मागणी याशिवाय, बहुतेक जण ज्या महत्त्वाच्या घोषणांची अपेक्षा करत आहेत त्यापैकी एक म्हणजे आयकर सवलत. कर सवलत, उच्च सूट मर्यादा आणि मूलभूत सूट मर्यादा 3 लाखांवरून 4 किंवा 5 लाखांपर्यंत वाढू शकते अशी अपेक्षा आहे. कमी करदर : वार्षिक 15 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी करदर कमी केले जाऊ शकतात.
सुव्यवस्थित कर व्यवस्था : कमी स्लॅब आणि कमी गुंतागुंतीसह कर चौकट सुलभ केली जाऊ शकते. 2025च्या केंद्रीय अर्थसंकल्पात क्रिप्टो उत्पन्नावरील 30 टक्के कर आणि 1 टक्का टीडीएस यंत्रणेचा आढावा घेण्यासारखे प्रगतीशील उपाय सादर केले जातील.
महाराष्ट्राबरोबरच देशाचा विकास, आर्थिक वाढ आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी क्रिप्टोकरन्सी आणि एनएफटी करप्रणालीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. ईवाय इंडिया क्रिप्टोकरन्सी आणि नॉन-फंजिबल टोकन्स (एनएफटी) कर लावण्याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यकता आहे. यामध्ये अस्पष्टता टाळण्यासाठी व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता (व्हीडीए)मधून होणारे नुकसान कसे हाताळले जाते हे संबोधित करणे समाविष्ट आहे. करांचे ओझे कमी करणे, अनुपालन सोपे करणे आणि विवादांचे निराकरण करणे यावर भर देऊन करदात्यांकरिता अनुकूल 2025चा अर्थसंकल्प तयार करू शकतात.
गुंतवणूक-केंद्रित वाढ : गेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलनसाठा 1.99 अब्ज डॉलरने घसरून 652.87 अब्ज डॉलर या सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला होता. याचे प्रमुख कारण म्हणजे कमी झालेली निर्यात आणि रुपया संतुलित ठेवण्यासाठी विक्री करावी लागत असलेले डॉलर. बर्याच बहुराष्ट्रीय कंपन्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. तेव्हा अशा वेळी परकीय गुंतवणुकीदारांना आकर्षित करण्यासाठी अर्थसंकल्पात ठोस असे प्राप्तिकर संदर्भात निर्णय घ्यायला हवेत. जेणेकरून उत्पादन क्षेत्रात नवीन गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास प्रेरित होतील. एकूण विकास प्रक्रियेला पाठिंबा देण्यासाठी सरकारी भांडवली खर्चावर लक्ष केंद्रित करायला हवे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये भांडवली खर्च 11.11 लाख कोटी रुपये ठेवण्यात आला होता. महसूल खर्च आटोक्यात राहिल्याने कालांतराने वित्तीय वर्षाची गुणवत्ता सुधारली आहे. 2024-25 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 25-26 मध्ये भांडवली खर्च 15 टक्क्यांनी वाढवण्याचा विचार अर्थसंकल्पात करायला हवा. खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना सुरू करायला हव्यात. यामुळे निर्यात वाढीसाठी चालना मिळून परकीय चलनसाठा वाढण्यास मदत होईल.
कृषी क्षेत्रावर भर : महाराष्ट्रात औद्योगिकीकरण झालेले असले तरी, राज्यातील अनेक प्रदेशांमध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे आणि संबंधित कामांमध्ये रोजगार मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्र केंद्रीय अर्थसंकल्पाकडून अपेक्षा ठेवू शकतो की, बरेच उद्योग हे कच्च्या मालासाठी कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत. तेव्हा अशा वेळी कृषी संशोधनावर भर देऊन उत्पादकता वाढवण्यावर आणि हवामान अनुकूल वातावरण विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. राष्ट्रीय सहकार धोरण सहकार क्षेत्राच्या पद्धतशीर, सुव्यवस्थित आणि सर्वांगीण विकासासाठी आत्मनिर्भरता प्रस्थापित करणे. मोहरी, भुईमूग, तीळ, सोयाबीन आणि सूर्यफूल यासारख्या तेलबियांसाठी उत्पादन आणि पुरवठासाखळींसाठी एफपीओ, सहकारी संस्था आणि स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देणे संकलन, कौशल्य विकास कार्यक्रम, प्रशिक्षण, साठवणूक आणि विपणनवर भर देणे आवश्यक आहे. मागील अर्थसंकल्पात महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प : 150 कोटी, पर्यावरणपूरक शाश्वत कृषी प्रकल्प : 598 कोटी, विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प : 600 कोटी निधी मंजूर झाला होता.
शेती समृद्धीमध्ये आणखी भर टाकण्यासाठी आकांक्षापूर्ण जिल्ह्यांच्या कार्यक्रमाच्या धर्तीवर 100 जिल्ह्यांसाठी कृषी उत्पन्न अभियान सुरू करून शेतकर्यांना नवीन तंत्रज्ञान आणि सेवा देण्यासाठी 5 वर्षांत 30 लाख शेती तंत्रज्ञ विकसित करण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करणे गरजेचे आहे. प्रत्येक गावात माती परीक्षण, सूक्ष्म सिंचन, ड्रोन, सेन्सर्स, शेती यंत्रसामग्री, कापणीनंतरचे तंत्रज्ञान तसेच गावातील पाणीपुरवठा प्रणालीचे संचालन आणि देखभाल यासारख्या तंत्रज्ञानात तज्ज्ञ असलेले 5-6 तंत्रज्ञ नेमायला हवेत. 12 प्राधान्य क्लस्टरचे वाटप पूर्ण करून, उर्वरित 41 ओळखल्या जाणार्या क्लस्टरसाठी आरएफपी सुरू करून, शेती एकत्रित करणार्यांना सहभागाची परवानगी देऊन आणि मोठ्या विशेष कंपन्यांद्वारे क्लस्टर स्तरावर वैयक्तिक उभ्या क्षेत्रांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देऊन फलोत्पादन क्लस्टरच्या खासगी क्षेत्राच्या स्वीकृतीला चालना द्यायला हवी.
पायाभूत सुविधांवर भर : रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उपाययोजना सुरू करण्याची अपेक्षा आहे. पायाभूत सुविधा प्रकल्प, नवीन वीज प्रकल्प, नवीन विमानतळ, वारसा मार्ग आणि रस्ते, नदी संवर्धन प्रकल्प, मेट्रो प्रकल्प, शहरीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित करून, थेट परकीय गुंतवणूक-अनुकूल धोरणे व्यावसायिक रिअल इस्टेट, परवडणारी घरे आणि वाहतूक पायाभूत सुविधा. शेती आणि औद्योगिक क्षेत्राला जोडणारा दुवा म्हणजे रस्ते/वाहतूक सुविधा यावर मागील अर्थसंकल्पात महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार : 400 कोटी, सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर : 466 कोटी, मुळा मुठा नदी संवर्धन : 690 कोटी, मुंबई मेट्रो : 1087 कोटी, नागपूर मेट्रो : 683 कोटी, पुणे मेट्रो : 814 कोटी निधी मंजूर झाला होता.