नवी दिल्ली – कॉंग्रेसनेते राहुल गांधी हे नेपाळ मधील एका नाईट क्लब मध्ये हजर असल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून त्या अनुषंगाने भाजप व अन्य नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सुरू केले आहे. तथापि त्याचा खुलासा करताना कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी म्हटले आहे की, लग्नाच्या सोहळ्याला उपस्थित राहणे अजूनही या देशात गुन्हा ठरलेला नाही. म्यानमार मधील नेपाळचे माजी राजदूत भीम उदास यांच्या मुलीच्या लग्नासाठी राहुल गांधी तिकडे गेले आहेत. आपणच त्यांना त्याचे आमंत्रण दिले होते असे उदास यांनी म्हटले आहे.
सुर्जेवाला यांनी आज या संबंधात खुलासा करताना म्हटले आहे की, राहुल गांधी सध्या आपल्या एका स्नेह्याच्या विवाहासाठी नेपाळला गेले आहेत. त्यांच्या महिला पत्रकार मैत्रिणीच्या लग्नासाठी ते त्यांच्या निमंत्रणावरून तिकडे गेले आहेत. लग्नाला हजर राहणे या देशात अजूनही गुन्हा ठरलेला नाही. कदाचित आजच्या दिवसानंतर भाजपने ठरवावे की, लग्नाला उपस्थित राहणे बेकायदेशीर आहे आणि मित्र असणे हा गुन्हा आहे.राहुल गांधी हे मोदीं सारखे विनानिमंत्रण नवाज शरीफ यांच्या बर्थडे पार्टीला गेले नव्हते असा टोमणांही त्यांनी मारला.
दरम्यान भाजपने मात्र या व्हिडीओवरून राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप नेते आणि बिहारचे मंत्री सय्यद शाहनवाझ हुसेन यांनी म्हटले आहे की,राहुल गांधी हे स्वतःचा राजकीय पक्ष चालवण्यापेक्षा अन्य कामातच व्यस्त आहेत. आम्ही आमच्या राजकीय पक्षांसाठी काम करतो, पण ते पार्ट्यांमध्ये हजेरी लावतात, असे हुसेन म्हणाले.
दरम्यान, कॉंग्रेस नेते आणि लोकसभा खासदार मणिकम टागोर म्हणाले की, प्रत्येकजण खाजगी कार्यक्रमांना उपस्थित राहतो, त्यामुळे “राहुल गांधी यांनी उपस्थित राहिल्यास काय चूक आहे?”.
यापूर्वी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधींना “पूर्णवेळ पर्यटक आणि अर्धवेळ राजकारणी, असल्याची टिप्पणी केली आहे.
भीम उदास यांच्या कन्या सुमनिमा यांचा हा विवाह सोहळा होता. त्या सीएनएन या वृत्तसंस्थेच्या पत्रकार आहेत.