परिंचे – श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे नवरात्र उत्सवानिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व देवी जोगेश्वरी मंदिरात महाराष्ट्रातील विविध भागांतील तमाशा कलावंतांनी हजेरी लावली आहे. वर्षातून एकदा महिला कलावंत देऊळवाड्यातील दगडी कासवावर आपली कला सादर करतात. शासकीय योजनांपासून तमाशा कलावंत वंचित असल्याची भावना कलावंतांनी व्यक्त केली.
नवरात्र उत्सवात श्रीनाथ चरणी आपली कला सादर करून वर्षभर व्यवसायाला बाहेर पडायचे, अशी या कलावंतांची अनेक वर्षांची परंपरा आहे. सध्या वीर येथे विविध संगीत पार्टी आल्या असून 200 नृत्यांगना, गायक, वादक आपली कला सादर करीत आहेत. दगडी कासवावर कलावंतांच्या हजेरीची सेवा रोज रंगत आहे.
गावचे पाटील नेताजी बाबुराव धुमाळ यांच्या वतीने नृत्यांगनांना सन्मानित करण्यात येत असल्याची देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष रामचंद्र धुमाळ यांनी सांगितले. देवस्थान ट्रस्टच्या वतीने या कलावंतांना कोरडा शिधा देण्यात येत असून, त्यांचे नऊ दिवस राहण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे धुमाळ व सचिव तय्यब मुलांनी यांनी सांगितले.
मानाच्या तमाशा पार्ट्यांचा समावेश
याठिकाणी हजेरी लावणाऱ्या मानाच्या संगीत पार्ट्यांमध्ये शोभा कुडाळकर, कौशल्या लोणंदकर, मीरा जावळेकर, जयश्री कुडाळकर, नीराबाई जावळेकर, लिलाबाई जावळेकर, लक्ष्मी कुडाळकर, उषा तळेगावकर, जयश्री कुडाळकर, सुनिता तळेगावकर, आदींचा समावेश आहे.
श्रीनाथ म्हस्कोबा आमची कुलदैवत आहे. त्यामुळे त्यांच्या आशिर्वाद घेऊन व्यवसायाकरिता वर्षभर बाहेर पडायचे या परंपरेने आमची ही पाचवी पिढी येथे हजेरी लावत आहे. येथील नऊ दिवसांची सेवा करून देवाचा कौल लावून आम्ही मार्गस्थ होतो. त्यानंतर घरच्या देवाला तांदळाचा कौल लावून व्यवसायात बरकतीसाठी श्रीनाथ महाराजांकडे साकडे घालतो. आजही आमच्यातील ज्येष्ठ कलावंत शासकीय योजनांपासून वंचित आहेत. अनेक कलावंतांना शासकीय मानधन मिळत नाही.
– सारिका जावळीकर, तमाशा कलावंत