बदल्या करवून घेण्याचा प्रयत्न फसला

आयुक्त भालसिंग सेवानिवृत्त; मनपाचा पदभार जिल्ह्याधिकाऱ्यांकडे

नगर  – मनपाच्या नगररचना विभागात पुन्हा बदलीसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांचा आटापिटा सुरू आहे. आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग हे शनिवार (दि.30) रोजी सेवानिवृत्त झाले. जाता जाता आयुक्त भालसिंग यांच्याकडून बदल्या करवून घेण्याचा या कर्मचाऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, भालसिंग यांनी खमकी भूमिका ठेवत या बदल्यांना नकार दिला. दरम्यान, या बदल्या केल्या तर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी दिला होता. आयुक्तांशी आपली चर्चा झाली असून, या बदल्या केल्या जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याचे बोराटे यांनी सांगितले.

भालसिंग यांनी काही दिवसांपूर्वी नगररचना विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह बारा कर्मचाऱ्यांच्या बदल्या अन्य विभागात केल्या होत्या. मलिद्याच्या दृष्टीने नगररचना विभाग महत्वाचा मानला जातो. त्यामुळे या विभागात बदली होण्यासाठी या कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. या बदल्यांसाठी मनपातील काही पदाधिकारीही प्रयत्नशील आहेत. आयुक्त भालसिंग (दि.30) सेवानिवृत्त होत आहेत. 1 डिसेंबरपासून आयुक्तपदाचा पदभार जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी याबदल्या करणार नाहीत. त्यामुळे भालसिंग जोपर्यंत आयुक्त आहेत, तोपर्यंत बदली करवून घेण्याची तयारी चालविली होती. अखेर भालसिंग यांनी या बदल्यास करण्यास नकार दिल्याने या कर्मचाऱ्यांचे प्रयत्न फोल ठरले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.