फोनद्वारे पेटीएम ग्राहकाची फसवणूक करण्याचा प्रयत्न

वाघोली येथील घटना : ग्राहकांच्या सर्तकतेमुळे डाव फसला

वाघोली- पेटीएम केवायसी करायची आहे, आपले पेटीएम अकाउंट बंद झाले असल्याचे फोनद्वारे सांगून वाघोलीतील एका पेटीएमच्या ग्राहकाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्राहकाने वेळीच फसवणुकीसाठी फोन केला असल्याचे ओळखल्याने पुढील फसवणुकीचा प्रकार टाळता आला. वाघोली परिसर व सर्वच नागरिकांनी पेटीएममधून बोलत असल्याचा फोन आल्यावर कोणतीही माहिती देऊ नये किंवा ते सांगतील तशी कार्यवाही करू नये असे आवाहन लोणीकंद ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर पोलिसांनी केले आहे.

वाघोलीतील एका पेटीएम ग्राहकाला तुमचे पेटीएम अकाउंट सस्पेंड केल्याचा मेसेज आला होता. मेसेजमध्ये पेटीएम ऑफिसचा एका मोबाइल नंबरवर संपर्क साधण्यास सांगितले. दुसऱ्यादिवशी पुन्हा दुसऱ्या मोबाइल नंबरवरून त्या ग्राहकाला पेटीएममधून बोलत असल्याचे सांगून पेटीएम केवायसी करण्यासाठी प्ले स्टोरमधून टीमव्ह्यूवर ऍप डाउनलोड करण्यास सांगितले. पेटीएमऐवजी वेगळेच ऍप डाउनलोड करण्यास सांगितले असल्याने ग्राहकाला शंका आली. त्याने फोन बंद केला. पुन्हा त्या व्यक्‍तीचा फोन आल्यानंतर तुमचे पेटीएम बंद करण्याची धमकीच एकप्रकारे दिली. ग्राहकाने फोन पुन्हा बंद करून पेटीएम केवायसी व टीमव्ह्यूवर ऍपबाबत माहिती घेतली असता फोनद्वारे अशा प्रकारे फसवणूक करून पैसे चोरल्याचे प्रकार घडले असल्याचे समजले.

  • जर तुम्हाला कोणी कॉल करून सांगितले की, पेटीएम केवायसी समाप्त झाली आहे. अथवा एसएमएसच्या माध्यमातून ती पूर्ण करा. तर अशा गोष्टींवर विश्‍वास ठेवू नका. कोणतेही पेटीएम अथवा पेटीएमचे कर्मचारी अशाप्रकारे कॉल करुन कधीच केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगत नाहीत. थर्ड पार्टी ऍप मोबाइलमध्ये इंस्टॉल करु नका. कंपनीने म्हटले आहे की, ग्राहकांचे केवायसी केवळ त्यांच्या अधिकृत एजेंटद्वारे केली जाते. याशिवाय तुम्ही पेटीएम ऍपवर देखील मिनिमम केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्यामुळे पेटीएमच्या नावाखाली येणाऱ्या कॉलला उत्तर देऊ नका. अन्यथा तुमचे खाते रिकामे होईल.
    – मानसिंगराव गोते पाटील, माजी उपविभागीय अधिकारी, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.