75 टक्‍के कामांच्या निविदा पूर्ण करण्याचा प्रयत्न

महापालिका आयुक्‍त : विधानसभा निवडणूक आचारसंहितेचा धसका 

पुणे – आगामी विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्याआधी अंदाजपत्रकातील सुमारे 75 टक्के कामांच्या “वर्क ऑर्डर’ देण्याची लगबग महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. त्यासाठी महापालिका आयुक्तांनी स्वत: सर्व विभाग प्रमुखांच्या, झोनल कमिशनरांच्या मॅरेथॉन बैठका घेण्याला सुरूवात केली आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्या दिवसापासून महापालिका आयुक्तांनी सहाय्यक क्षेत्रीय आयुक्तांपासून ते झोनल कमिशनर आणि विभागप्रमुख यांच्या बैठका घेण्याला सुरूवात केली आहे. त्यामध्ये अंदाजपत्रकातील कामांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने चर्चा सुरू आहे. या बैठकांमधून चर्चा करून सुमारे एक हजार कामांच्या निविदांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामध्ये विविध महसुली कामांचा समावेश असतो. या कामांसाठी नगरसेवकही आग्रही असतात. त्यामुळे प्रभागातील या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
येत्या 30 जूनपर्यंत संपूर्ण अंदाजपत्रकीय कामांच्या 30 टक्के कामांचे वर्क ऑर्डर देऊन कामे करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

दि.31 ऑगस्टच्या दरम्यान विधानसभेची आचारसंहिता लागेल असे गृहित धरण्यात आले आहे. त्या आधी अंदाजपत्रकाची 75 टक्के अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आहे. त्याचीही तयारी प्रशासन स्तरावर सुरू करण्यात आली आहे. जर 31 ऑगस्टपर्यंत 75 टक्के कामांच्या वर्क ऑर्डर दिल्या गेल्या तर पुढे केवळ 25 ते 30 टक्केच कामे राहतात. ऑक्‍टोबरमध्ये आचारसंहिता संपल्यानंतर ही उर्वरीत निविदा प्रकिया पूर्ण करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया आणि अन्य ठरवलेली कामे वेळेत पूर्ण होत आहेत, की नाही याचे मॉनिटरिंग रोजच्या रोज सुरू आहे. त्यासाठीच या बैठका सुरू असून, वॉर्डस्तरापासून ते मुख्य विभागापर्यंत याची रोजचा आढावा घेण्याचे कामही सुरू आहे, असे राव यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.