प्रेमविवाह केलेल्या नव दाम्पत्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; मुलीचा मृत्यू

सैराट स्टाईल प्रकरणाची तालुक्‍यात चर्चा

पारनेर: प्रेमविवाह केलेल्या नव दाम्पत्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना पारनेर तालुक्‍यातील निघोज येथे घडली. यामध्ये रुख्मिणी मंगेश रणसिंग (वय 19) हिचा 70 टक्के भाजल्याने मृत्यू झाला. गेली पाच दिवस रुख्मिणी मृत्यूशी झुंज देत होती. दोन दिवसांपूर्वी तीचा पारनेर पोलीसांनी जबाब घेतला होता. वडील, काका, मामा यांनी आमच्या दोघांच्याही अंगावर पेट्रोल ओतून आम्हाला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तीने जबाबात सांगितल्याची माहिती पोलीसांनी दिली. दरम्यान मंगेश चंद्रकांत रणसिंग हा सुद्धा 60 टक्के भाजला असुन तो सुद्धा अत्यवस्थ असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.

मंगेश व रुख्मिणी यांचे सहा महिन्यापूर्वी लग्न झाले होते. तीचे वडील काका व मामा यांचा लग्नाला विरोध होता. म्हणून एक ना एक दिवस त्यांचा काटा काढण्याचा या तिघांचा प्रयत्न होता. निघोज येथे गवंडी व्यवसाय करणारे मंगेश चंद्रकांत रणसिंग (वय 23) हे दि. 1 मे रोजी त्यांची पत्नी रुख्मिणी यांना भेटण्यासाठी निघोज येथे वाघाचा वाडा येथे गेले होते. त्यापूर्वी या पतीपत्नीचे स्वयंपाक करण्यावरून भांडणे झाले होते. म्हणून रुख्मिणी ही माहेरी निघून गेली होती.

मंगेश रुख्मिणीला भेटण्यासाठी घरी गेल्यावर रुख्मिणीचे वडील रामा रामफल भरतिया, मामा घनशाम मोहन राणेंज, काका सुरेंद्रकुमार रामफल भरतिया या तिघांनी रुख्मिणीला मंगेश बरोबर न पाठवता त्याला मारहाण केली. यावेळी रुख्मिणी मात्र मंगेश बरोबर जाण्यास निघाली असता वरील तिघांनी या पती-पत्नीला घरात कोंडून त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले व घराला कूलूप लावून निघून गेले. मात्र आरडाओरडा ऐकून शेजारच्या लोकांनी त्यांना बाहेर काढले व रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी मंगेश व रुख्मिणी यांचा जबाब दि. 4 मे रोजी घेतला असून त्यात या पती-पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला ही बाब स्पष्ट झाली आहे.

पोलीसांनी रुख्मिणीचा मामा घनशाम राणेंज व काका सुरेंद्रकुमार भरतिया यांना ताब्यात घेतले असून रुख्मिणीचे वडील रामा रामफल भरतिया हा फरार झाला आहे. रुख्मिणी हिचा काका सुरेंद्रकुमार भरतिया व मामा घनशाम राणेंज यांना पारनेर न्यायालयाने दि. 10 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. रुख्मिणीचे वडील रामा रामफल भरतिया हा फरार असून त्याला पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.

या घटनेने निघोज परिसरात खळबळ उडाली असून याबाबत पोलीस अधिक माहिती घेत आहेत. पोलीस उपअधीक्षक मनिष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार व उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे हे पुढील तपास करीत असुन सदर आरोपीवर 307 /34 नुसार गुन्हा दाखल केला असुन मयताचे कागदपत्र प्राप्त होताच 302 कलम आरोपीवर लावण्यात येणार असल्याचे तपासी अधिकारी उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.