करोनाच्या लॉकडाऊनमुळे मनोरंजन विश्वात खूपच उलथापालथ झाली. थिएटरऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमे रिलीज व्हायला लागले. अमेरिकेतही या संदर्भात खूप घडामोडी घडत आहेत. त्याचे परिणाम भारतात, मुंबईतही जाणवायला लागले आहेत. हॉलीवूडमध्ये गाजलेला सुपर स्पाय जेम्स बॉन्डचे सिनेमे आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज व्हावेत, या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
अमेझॉन प्राईमने या संदर्भात हॉलीवूडमधील एमजीएमबरोबर चर्चा सुरू केली आहे. अमेझॉन या स्टुडिओला खरेदी करण्याची शक्यता असल्याचीही चर्चा आहे. तसे झाले तर जेम्स बॉन्डचे गाजलेले सिनेमे अमेझॉन प्राईमवर बघायला मिळू शकतील. त्यातच एमजीएम स्टुडिओकडे जेम्स बॉन्डच्या सिरीजमधील सर्व गाजलेल्या सिनेमांचे हक्क आहेत. या गाजलेल्या सिनेमांना थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केले जाण्याची शक्यता वाढली.
अर्थात याचा फायदा भारतातील प्रेक्षकांना होणार हे निश्चित आहे. अर्थात हे अर्थकारण यशस्वी झाले तर हे सर्व शक्य आहे. जेम्स बॉन्ड सिरीजमधील सर्वात शेवटचा सिनेमा “नो टाईम टू डाय’ हा तयार झाला आहे. मात्र त्याची रिलीज डेट चार वेळेला पुढे ढकलली गेली आहे. कदाचित ओटीटीवर रिलीज केला जाणारा तो पहिला बॉन्डपट ठरू शकतो.