खेडमध्ये पुन्हा विमानतळ आणण्याचा प्रयत्न

आमदार सुरेश गोरे : अर्थसंकल्पीय अधिवेशनात तालुक्‍यातील प्रश्‍न उपस्थित करणार

राजगुरूनगर – येथील हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारक बांधण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित करून या कामासाठी भरघोस निधी मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, तर तालुक्‍यातून हद्दपार झालेले विमानतळ पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार सुरेश गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खेड तालुक्‍यातील सर्व गावांतील विविध प्रश्‍नांचा आढावा घेण्यासाठी खेड पंचायत समितीमध्ये शुक्रवार, शनिवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या आढावा बैठकीनंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आमदार गोरे यांनी सांगितले की, तालुक्‍यातील विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सर्व विभागाचे अधिकारी यांच्याकडून सुरु असलेल्या कामाचा, प्रलंबित कामांचा आणि कराव्या लागणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित केले जाणार आहेत. या अधिवेशनात 59 तारांकित प्रश्‍न मांडण्यात येणार आहेत. 5 अशासकीय तर काही शासकीय प्रश्‍नाबरोबर लक्षवेधी आणि अर्धा तास चर्चेचे काही प्रश्‍न मांडले जाणार आहेत. यावर्षी तालुक्‍यात सर्वाधिक दुष्काळाचे सावट आहे. तालुक्‍याच्या इतिहासातील पहिली चारा छावणी झाली आहे. त्या माध्यमातून पशुधन वाचविण्याचा प्रयत्न आहे.

खेड तालुक्‍यातून काही तांत्रिक बाबीमुळे हद्दपार झालेले आंतरराष्ट्रीय विमानतळ पुन्हा खेड तालुक्‍यात होण्यासाठी प्रयत्न केले जातील. तालुक्‍यातील नागरिकांना विमानतळ हवे की नाही याबाबत सर्वेक्षण केले आहे. मागील काही काळात विमानतळाबाबत अनेक आरोप प्रत्यारोप झाले. विमानतळ तांत्रिक कारणास्तव पुरंदर तालुक्‍यात गेले; मात्र पुरंदर तालुक्‍यातील नागरिक विमानतळास विरोध करीत असल्याने ते पुन्हा खेड तालुक्‍यात आणण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. नागरिकांना विमानतळ हवे असल्याने त्यासाठी प्रयत्नशील असून अधिवेशनात या संदर्भात पुनर्प्रश्‍न उपस्थित केला असल्याचे सांगितले.

धरणग्रस्तांचे प्रश्‍न अधिवेशनात मांडणार
एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम तर दुसरीकडे प्रचंड दुष्काळ पडल्याने अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना वेळ मिळाला नाही; मात्र तालुक्‍यातील काही दानशूर व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या पुढाकाराने दुष्काळग्रस्त गावांना पिण्याचे पाणी पुरविण्यात आल्याने दुष्काळावर मात करता आली. तालुक्‍यात तीन धरणे असून तालुक्‍यात दुष्काळ जाणवतो यावर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जाणार आहेत. धरणांच्या बुडीत क्षेत्रात बंधारे बांधण्यात येणार आहेत. चासकमान, भामा आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी अधिवेशनात प्रश्‍न मांडणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.