हवाई दलाचे पॅरिसमधील कार्यालय फोडण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली – ‘राफेल’ लढाऊ विमानांच्या निर्मिती प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी भारतीय हवाई दलाने पॅरिसमध्ये उघडलेले कार्यालय फोडण्याचा प्रयत्न झाला असल्याची धक्कादायक माहिती लष्करातील सूत्रांनी दिली आहे. पॅरिसच्या उपनगरामधील या कार्यालयातून “राफेल’ प्रकल्पाच्या व्यवस्थापन पथकाचे कामकाज चालते.

या कार्यालयात काही अज्ञात व्यक्‍तींनी घुसखोरी करून मोडतोड केली आहे. उपनगरी पोलिस आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने या प्रकाराचा तपास सुरू करण्यात आला आहे. हा प्रकार म्हणजे हेरगिरी वाटावी, असाच आहे. या प्रकारामध्ये राफेलशी संबंधित कार्यलयातील महत्वाची गोपनीय कागदपत्रे चोरण्याचा प्रयत्न होता का, याची प्राथमिक तपासणी केली जात आहे. आतापर्यंत तरी कोणत्याही हार्डवेअरची किंवा महत्वाच्या दस्ताऐवजांची चोरी झाल्याचे निष्पन्न झालेले नाही. स्थानिक पोलिसांकडून या प्रकाराचा तपास सुरू अहे, असे सूत्रांनी सांगितले.

या प्रकाराबाबत भारतीय हवाई दलाकडून संरक्षण मंत्रालयाला माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात संरक्षण मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही.

भारत सरकार आणि फ्रान्स यांच्य्मध्ये सप्टेंबर 2016 म्ध्ये 36 राफेल विमानांच्या खरेदीबाबत 58 हजार कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. या करारानुसार पहिले राफेल विमान पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये भारतात उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.