पिंपरीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न

पिंपरी – एचडीएफसी बॅंकेच्या एटीएमचा सेफ्टी दरवाजा व कॅमेरा तोडून चोरीचा प्रयत्न केला. ही घटना पिंपरीतील उद्यमनगर भागात रविवारी (दि. 8) पहाटे घडली.

दिनेश धोंडीराम शिर्के (वय 27, रा. शिवनगर, दिघी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्यमनगर, पिंपरी येथे एचडीएफसी बॅंकेचे एटीएम सेंटर आहे. रविवारी पहाटे दीड वाजताच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला. तेथील सीसीटीव्ही कॅमेरा फोडला. त्यानंतर एटीएमचे सेफ्टी दरवाजा तोडून चोरीचा प्रयत्न केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख याबाबत अधिक तपास करीत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी एटीएम सेंटरला आपले टार्गेट केले आहे. चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन, निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन आणि पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अशा जवळपास सात घटना घडल्या आहेत. नेवाळेवस्ती, चिखली येथे एटीएम सेंटर फोडण्याच्या घटनेनंतर गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांचे एक खास पथक प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्यावेळी गस्त घालण्यासाठी तैनात केले आहे. मात्र तरीही अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.