प्रशासन झाले खोटे आश्वासन झाले मोठे

संतप्त धरणग्रस्तांकडून चिटेघर धरण फोडण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळला

नवारस्ता – बाधित प्रकल्पग्रस्तांना जमिनी ऐवजी वांग-मराठवाडी धरणाप्रमाणे सव्वा चारपट रक्कम मिळावी, असा प्रस्ताव सातारा येथे पुनर्वसन कार्यालयात गेली कित्येक वर्षे धूळखात पडला आहे. याच्या निषेधार्थ बुधवारी धरणग्रस्त चिटेघर धरण फोडण्यासाठी हातात टिकाव, खोरे घेवून मोठ्या संख्येने धरणावर दाखल झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी चारपट रकमेचा प्रस्ताव जलसंपदा विभागामार्फत पुणे येथील मुख्य अभियंत्यांकडे सोमवार, दि. 11 पर्यंत पाठवू. असे आश्वासन दिल्यानंतर धरणग्रस्त शांत झाले. यावेळी चिटेघर धरणावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मणदूरे विभागातील साखरी-चिटेघर धरणाचे काम 1999 साली आघाडी शासन येताच तत्कालीन मंत्री अजित पवार व मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या हस्ते भूमिपूजन होवून कामास सुरुवात करण्यात आली होती. त्यासाठी चिटेघर येथील 27 हेक्‍टर, साखरी येथील 26 हेक्‍टर, मेंढोशी 10 हेक्‍टर व घाणव येथील 6 हेक्‍टर जमीन संपादीत करण्यात आली. काही काळ या धरणाचे काम अखंडीत सुरु होते.धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात योग्य कार्यवाही न झाल्याने मध्यंतरी काम बंद पडले. त्यानंतर 2010 साली या धरणाची घळभरणी होवून धरणात पाणीसाठा करण्यात आला. त्यानंतर आजपर्यंत या पाणीसाठ्यातून परिसरातील शेतीत आमुलाग्र बदल झाला. धरणातील पाण्यामुळे सुरुल गावापर्यंत पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला.

2010 साली बाधित शेतकऱ्यांनी आपल्या भूसंपादनाच्या मिळालेल्या रकमेतून 65 टक्के रक्कम शासनाकडे पर्यायी जमिनीसाठी भरली. मात्र आजतागायत बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून पर्यायी जमिनीचा तुकडाही मिळाला नाही. यासाठी बाधित शेतकऱ्यांनी जलसंपदा व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवल्या. प्रत्येक वेळेला शेतकऱ्यांना आश्वासनाशिवाय काहीच पदरात पडले नाही.

पर्यायी मिळणाऱ्या जमिनीत अनेक अडथळे निर्माण झाल्याचा इतिहास सर्वश्रृत आहे. त्यामुळेच या बाधित शेतकऱ्यांनी शासनाकडे पर्यायी जमिनीऐवजी रोख रक्कमेचा प्रस्ताव ठेवला आहे. यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दीड वर्षापूर्वी उपोषणही केले होते. मात्र हा प्रस्ताव सातारा येथील जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागात फिरत राहिला. प्रस्ताव पुणे येथील वरिष्ठ कार्यालयाकडे जाणे महत्वाचे होते. काही गाफिल अधिकाऱ्यांच्या करामतीमुळे प्रस्तावाचे भिजत घोंगडे कायम राहिले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांवर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली.

अखेर संतापलेल्या बाधित शेतकऱ्यांनी धरणातील पाणीसाठा रिकामा करुन आपल्या मूळ जमिनी पुन्हा कसण्यासाठी बुधवारी टिकाव व खोऱ्यासह धरणस्थळ गाठले. यावेळी विक्रमबाबा पाटणकर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अधिकारी सुरेन हिरे, आर. के. लवांगरे, संदीप पानस्कर, यु. एल. शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंगद जाधवर, पोलीस निरीक्षक यु. एस. भापकर, पोलीस उपनिरीक्षक दीपाली शिंदे यांच्यासह धरणग्रस्तांची बैठक झाली. मात्र जमिनीऐवजी सव्वा चारपट रकमेचा प्रस्ताव तातडीने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम असल्याने अधिकारी व प्रकल्पग्रस्त यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. अखेर प्रस्ताव मुख्य अभियंत्यांकडे दि. 11 पर्यंत पाठवण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर प्रकल्पग्रस्त शांत झाले.

अधिकाऱ्यांनी काढला पळ…

या आंदोलनामध्ये संबंधीत विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता सुरेन हिरे यांच्यावर संतप्त शेतकऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार केला असता शेतकऱ्यांच्या काही प्रश्नाला उत्तर देण्यास ते असक्षम ठरले. त्याचबरोबर संबंधित प्रकल्पाचा प्रस्ताव पुढे का पाठवला नाही, असे विचारले असता तो कुठेतरी गहाळ झाले असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. त्याचबरोबर उपस्थित असणाऱ्या वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना यासंदर्भातील माहिती देण्यास साफ नकार दिला व शेतकऱ्यांना कोणताही सक्षम निर्णय किंवा पर्याय न देता त्यांनी तेथून पळ काढला.

सन 1999 पासून धरणासाठी जमिनी उकरण्यात आल्या. त्या बदल्यात धरणग्रस्तांना काही न मिळाल्याने त्यांच्यावर अन्यायच झाला आहे. प्रकल्पग्रस्तांना पर्यायी मिळणाऱ्या जमिनीत झालेल्या तक्रारी यामुळे त्यांना जमिनी कसता येत नाहीत. हा इतिहास असल्याने आम्ही सव्वा चारपट रकमेच्या प्रस्तावासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. मात्र दीड वर्ष झाली प्रस्ताव पुढे गेलाच नाही. त्यामुळे धरणग्रस्तांवर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ शासनाने आणली आहे. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवून अधिकाऱ्यांनी सकारात्मक बाजू प्रकल्पग्रस्तांसमोर ठेवावी.

विक्रमबाबा पाटणकर
माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)