जप्त केलेली वाहने पुन्हा पळवून नेण्याचा प्रयत्न

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या प्रयत्नामुळे फसला प्रयत्न : तहसीलच्या पथकाने रात्र काढली जागून

पारनेर(प्रतिनिधी) – पारनेर तालुक्‍यातील सुपा एमआयडीसी येथे असणाऱ्या जपानी कंपन्यांमधील विनापरवाना बेकायदा गौणखनिज उत्खनन करणाऱ्या वाहनांवर शनिवारी (दि. 7) तहसीलदार ज्योती देवरे यांनी छापा टाकत कारवाई केली. जवळपास दोन कोटीहून अधिक दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र वाहने ताब्यात घेत असताना काही वाहने पळवून नेण्यात आली. तसेच काही वाहने पळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्यामुळे तहसीलदार ज्योती देवरे यांनी तत्परता दाखवत रात्रभर पथकासह घटनास्थळी तळ ठोकला होता.

शनिवारी सकाळी नव्याने उभारण्यात आलेल्या सुपा म्हसणे फाटा एमआयडीसी येथे पारनेर महसूलच्या पथकाने छापा टाकत जवळपास 27 वाहने व वाळू, मुरुम, खडी यावर दंडात्मक कारवाई केली. ही प्रक्रिया रविवारी दिवसभर सुरू होती. वाहने जास्त असल्याने त्यांचा पंचनामा करणे व ती वाहने ताब्यात घेऊन पारनेर तहसील कार्यालयात आणणे यासाठी विलंब लागत होता.

मायडिया कॅररेर या कंपनीने सूरज व ई.सी.आर. या कंपन्यांना उप ठेका दिला होता. शनिवारी रात्री तहसीलदार व त्यांचे पथक कारवाई करून निघाल्यानंतर ई.सी.आर. या कंपनीतून मागच्या बाजूचे पत्रे तोडून दोन जेसीबी व एक डंपर
पळवून नेला. या वाहनांचा पंचनामा केला असल्याने सुपा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांना वाहनांचा तपास करून वाहने हजर करण्याबाबत पत्र तहसीलदार यांनी दिले आहे. मिंडा कंपनीत विपुल सावंत हा रात्री 2 वाजता पोकलेन पळविण्याच्या उद्देशाने आलेला असता तहसीलदार ज्योती देवरे या त्याठिकाणी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. त्यामुळे महसूलचे पथकासह तहसीलदार ज्योती देवरे या घटनास्थळी रात्रभर तळ ठोकून होत्या.

पोलिसांनी या कामात मदतीसाठी रात्री फक्त दोन होमेगार्डची नियुक्ती केली होती. त्यामुळे 20 तलाठ्यांना 28 तास सलग ड्यूटीवर ठेवण्यात आले होते. पोकलेन आण्यासाठी ट्रेलरच्या फेऱ्या करण्यात येत आहेत. नादुरुस्त काही वाहनांची ताबा पावती करून कंपनी व्यवस्थापनाकडे स्थानबद्ध केली आहेत. रात्री उशिरापर्यंत 16 वाहने जमा झाली असून, पुढील कारवाई सुरू ठेवून सोमवारी संबंधित ठेकेदारांना नोटिसा देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.

तहसीलदारांच्या कारवाईचे तालुक्‍यातून स्वागत
पारनेरमध्ये तहसीलदार ज्योती देवरे यांनी धडक मोहीम राबवली जात असून, यात विनापरवाना गौणखनिज उत्खनन अवैध वाहतूक व्यवसाय, वाळू माफिया, खडी माफिया आदी व्यवसाय व उद्योग धंदे करणाऱ्या विरोधात ही धडक मोहीम राबविण्यात येत आहे. प्रशासनाच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून मोठी दंडात्मक कारवाई केली जात आहे. या कारवाईचे तालुक्‍यातील जनतेने स्वागत केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)