उल्हासनगर – एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला असून कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले आहेत. मात्र, संपात सहभागी घेतला होता म्हणून आता वरिष्ठ त्रास देत असल्याने एका एसटी कर्मचाऱ्याने एसटी डेपोमध्येच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सचिन कदम असे या कर्मचाऱ्याचे नाव असून उल्हासनगरजवळील विठ्ठलवाडी एसटी डेपोमध्ये हा प्रकरा घडला. सचिन कदम या आगारात मॅकॅनिक म्हणून कार्यरत आहेत.
सचिन कदम एसटी संपात सहभागी होते. यामुळे आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सचिन यांना त्रास दिला जात होता, असा आरोप करण्यात येत आहे. या त्रासाला कंटाळूनच सचिन यांनी प्रमाणापेक्षा जास्त झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्येच्या चिठ्ठीत त्यांनी त्या अधिकाऱ्याचे नाव नमूद केले होते.
सचिन कदम यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्याचे इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच, त्यांच्या सहाकाऱ्यांनी त्यांना उल्हासनगरमधील रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.