अत्याचारासह खुनाचा प्रयत्न; सात जणांवर गुन्हा

आरोपीत बाजार समितीच्या संचालकाचा समावेश : ऍट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल 

श्रीगोंदा – दलित युवतीवर अत्याचार करून, तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच गावातून हाकलून दिल्याप्रकरणी लखनकुमार काकडे, सुधीर नलगे, भाजप नेते तथा बाजार समितीचे संचालक लक्ष्मण नलगे, भाऊ नलगे, कुमार काकडे, शुभांगी नलगे, स्नेहल काकडे-भोसले (सर्व रा. सांगवी दुमाला) यांच्याविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पीडित युवतीने दिलेली फिर्यादीत म्हटले आहे की, 2014 मध्ये आरोपी लखन काकडे याने फिर्यादीजवळ येत लग्नाबाबत विचारणा केली. लग्न न केल्यास स्वतः आत्महत्या करून फिर्यादीच्या कुटुंबियांची नावे टाकील, अशी धमकी दिली. या सर्व गोष्टीला घाबरून फिर्यादी लग्नास तयार झाली. 1 फेब्रुवारी 2019 मध्ये आरोपी लखन काकडे याने फिर्यादीच्या घराच्या पाठीमागे फिर्यादीला नेत तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. तसेच फिर्यादीचे व्हिडिओ, छायाचित्र काढले.

ही बाब आरोपी लक्ष्मण नलगे, सुधीर नलगे, भाऊ नलगे, कुमार काकडे, शुभांगी नलगे, स्नेहल काकडे-भोसले यांना समजताच आरोपींनी फिर्यादी युवतीला बळजबरीने विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर 21 फेब्रुवारी रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेली. त्यावेळी वरील आरोपी पोलीस ठाण्याभोवती जमले होते. त्यांनी फिर्यादीला दमबाजी करत आरोपी सुधीर नलगे याने फिर्यादीला मारहाण केली. त्यावेळी नाईलाजाने फिर्यादी फिर्याद दाखल न करताच निघून आली.

त्यानंतरही वरील आरोपी लखन काकडे याचा अत्याचार सुरूच होता. फिर्यादीने वारंवार विनंती करूनही आरोपी लखन काकडे याने मोबाईलमधील छायाचित्रे आणि व्हिडिओ डिलिट केले नाहीत. अखेर काल (दि.23) रात्री पीडित फिर्यादीने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली.
वरील आरोपी विरोधात अत्याचार, जिवे मारण्याचा प्रयत्न, त्याचबरोबर ऍट्रॉसिटी कायद्यानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.