सोशल मीडियावर बनावट खाते : बळी न पडण्याचे कृष्ण प्रकाश यांचे आवाहन
पिंपरी – पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट खाते तयार करुन फसवुणकीचा प्रयत्न केला जात आहे. तसेच मॅसेंजरद्वारे काही नागरिकांकडे पैशांची मागणी करण्यात आली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी फसव्या लोकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे आपल्या कार्यशैली आणि खेळांमधील प्राविण्यामुळे राज्यात लोकप्रिय आहेत. याचाच गैरफायदा घेत ठकांनी त्यांच्या नावाने बनावट खाते तयार केले. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाचा वापर करून अज्ञातांनी सोशल मीडियावर ‘Krishna Mumbai’ या नावाने बनावट अकाउंट तयार केले. त्या अकाउंटवर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे फोटो देखील लावण्यात आले. त्यानंतर त्या फेक अकाउंटच्या मॅसेंजरद्वारे काही लोकांशी संपर्क केला.
‘पेटीएम वापरता का’ असे देखील विचारले. त्याद्वारे काही रक्कम पाठवण्याची विनंती करत 10 हजार तर काहींकडे 20 हजार रुपये पाठवण्यास सांगितले. त्यामध्ये अज्ञात व्यक्तीने 7027798520 या क्रमांकावर पैसे पाठवण्यास सांगितले आहे.
याबाबत आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. ‘माझ्या नावाने अज्ञातांनी सोशल मीडियावर काही अकाउंट सुरू केली आहेत. त्याद्वारे पैशांची मागणी केली जात आहे. हा प्रकार गंभीर आहे. कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी याला बळी पडू नये.
गुडगाव परिसरातून चालतोय गोरखधंदा
सोशल मीडियावरील सदरचे बनावट खाते दिल्लीजवळील गुडगाव परिसरातून हाताळण्यात येत असल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्तीचा आयपी अड्रेस व इतर सर्व माहिती गोळा करण्याचे काम सायबर विभागाने हाती घेतले आहे. मात्र थेट पोलीस आयुक्तांच्या नावाने असे प्रकार सुरु असल्याने शहरात खळबळ उडाली आहे.