प्रयत्न

“प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ असा एक श्‍लोक आहे. खरं तर त्याचा अर्थ फारच वेगळा आहे त्याचा शेवट मूर्खाचे समाधान कधीच करता येणार नाही असा आहे. पण जनमानसात फक्त पहिलीच ओळ राहिली आहे. पार प्रयत्न केला तर असाध्यही साध्य करता येईल असं आपण कायमच म्हणत असतो. लोकमान्य टिळक म्हणायचे, “रेल्वेने जाताना आम्ही कायम वेळेपूर्वीच स्टेशनवर पोहोचतो. कारण धावत पळत जाऊन रेल्वे सुटता सुटता मिळाली तर ती नशिबानं मिळाली असा अर्थ येईल पण आरक्षण करून, वेळेपूर्वीच स्टेशनवर गेलो तर आपण ती प्रयत्नानं मिळवली असा त्याचा अर्थ होईल. आणि कोणतीही गोष्ट आम्ही प्रयत्नानंच मिळवू इच्छितो, नशिबानं नाही.

असाच प्रकार जगविख्यात गायिका आशा भोसले यांच्या बाबतीतही आहे. भक्तीगीते, चित्रगीते, लावण्या, पॉपगीते अशी अकरा हजारांच्या वर गाणी गाणाऱ्या त्या जगातील एकमेव गायिका आहेत. शिवाय चैतन्यानं, हसरेपणानं सलसलणारी त्यांची बुटकी मूर्ती पाहायला अजूनही प्रत्येकाला आवडतं. दैवी आवाज नसून आणि भोवतीली इतर गायिकाच नाही तर प्रत्यक्ष मोठ्या बहिणीशी स्पर्धा असून केवळ सततचा रियाज आणि प्रयत्न यामुळेच सगळ्या भारतीय भाषांमधून त्या हजारो गीतं गायिल्या. हजारो प्रत्यक्ष कार्यक्रम आणि अजूनही स्पर्धांना प्रमुख पाहुण्या म्हणून जाणं हे केवळ अशक्‍य आहे.

शिवाजीमहाराजांवर संशोधन करून पुस्तकं आणि शब्दशः हजारो कार्यक्रमांद्वारे लक्षावधी लोकांपर्यंत जन्मभर पोचवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना कसं विसरता येईल? स्वतःचं पोट तर कसंही कोणी भरतो. पण त्यामागे मोठा, विशाल, उदात्त हेतू असावा असं करणारे काहीजण जेव्हा प्रत्यक्ष समाजात जगताना दिसतात तेव्हा मान तर लवतेच पण काम करण्यासाठी आपणही तयार असावं असं वाटतं.

शेकडोवेळा बल्ब तयार करण्याचे प्रयत्न फसूनही एडिसन निराश न होता पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिले. खरं तर त्यांचे ऋण मानवजात फेडूच शकणार नाही. कारण त्यामुळेच आज आपण रात्रीही प्रकाशात, शेकडो उपकरणं वापरत सुखानं जगतो आहोत.
“लहरोंसे डरकर नौका पार नहीं होती
कोशिश करनेवालोंकी हार नही होती’
असी एक फार छान हिंदी कविता आहे.
समुद्रात नाव लोटल्यानंतर वारा येणार, सीड फडफडणार, नाव हलत हुडत राहणार, वादळं येणार हे सगळंच प्रवासात अटळ आहे कधीकधी नावेला छिद्र पडून त्यातून पाणीवरती येतं. पण नाव चालवतच राहावी लागते. लाटांना घाबरून नाव किनाऱ्यावरच पडून राहिली तर ती नाव उरत नाही. ते “नाव’ हे नाव दिलेलं कलेवर, मृत वस्तू उरते.
तसंच आयुष्य जगत असताना कधी उजेड कधी अंधार, कधी हार, कधी जीत, कधी हारतुरे, कधी शिव्याशाप. हे सगळं असणारच. चुकाही होणार, निराशा येणार या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या असतात.

आपणच चुकांना घाबरून प3यत्न का सोडायचे? प्रयत्नच सोडून दिले तर कधीच यश÷पयश येणार नाही पण कधीच शिकायलाही मिळणार नाही त्याचं काय? आपणच निराशा झटकून टाकायची. पुन्हा मोकळ्या हवेत हिंडायला जायचं, मित्रांशी गप्पा मारायच्या. आपल्या चुका त्यांना सांगून त्यावर आपमच हसायचं. आपण आपल्याच चुकांचे समर्थन तरी करतो नाहीतर एकदम स्वतःला शिक्षा तरी करून घेतो.  ही दोन्ही टोकं आहेत. हे दोन्ही अतिरेक आपण टाळणं गरजेचं आहे. समर्थन न करता आपण ापली चूक मान्य केली तर ती पुन्हा होत नाही. त्यासाठी शिक्षा करून घेण्याची गरज नाही.
शेवटी गायक जसा रोज पहाटे उठून ओंकार म्हणतो, तंबोऱ्यावर पेटीवर सूर लावून त्यावर ताना पलटे असा अभ्यास करत राहतो तेच प्रयत्न.

अध्यात्माचा, व्यायामाचा, स्वयंपाकाचा असे वेगवेगळे प्रयोग आपोप घडतात, पम प्रयत्न मात्र रोजच करावा लागतो.
आपली हमखास चूक होते ती काम एकाग्रपणे न करण्यात. काम करताना घरचा विचार घरात आल्यावर ऑफिसचा, मित्रांशी गप्पा मारताना टीव्हीवरच्या मालिकेचा तर मालिका पाहताना शंभरातल्या पंच्याण्णवजणी भाजी निवडतात, कपडे घडी करतात, स्वयंपाक करतात, बोलतात आणि अनेक!

आपण जर एकावेळी एकच काम एकाग्र होऊन, चूक होऊ न देता चोखपणे केलं तर त्या प्रयत्नांना यश आलंच पाहिजे. एकीकडे आपणच ते काम यांत्रिकपणे करत राहायचं आणि दुसऱ्या बाजूला आपणच ुप्रयत्नांना यश येत नाही म्हणायचं ही आपली वृत्ती असते. सतत, रोज, डोळसपणे आमि एकाग्रपणे आपण जर प्रयत्न करत राहिलो तर ती त्या कामाची पूजाच होते. त्या माणसाला देवाची पूजा नाही करावी लागत. त्यालाच कर्मयोग म्हणतात. मग कबिरांचे शेले दोहे म्हणता म्हणता पुरे होऊन जातात देव जनाबीाला जातं ओढायला मदत करतो आणि तिथंच प्रयत्नांत परमेश्‍वर असतो.

– सहजानंद

Leave A Reply

Your email address will not be published.