पवित्र पोर्टलचा प्रश्‍न चर्चेतून सोडविण्यासाठी प्रयत्नशील

शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी : शासनासमोर संस्थांची बाजू मांडणार

सातारा- महाराष्ट्र हा शिक्षण क्षेत्रात महत्वाची भूमिका पार पाडत आहे. त्यामध्ये शिक्षण संस्था व संस्थापकांचे मोठे योगदान आहे. संस्थाचे अनेक प्रश्‍न आहेत ते मार्गी लावू. शासनासमोर संस्थांची बाजू मांडून प्रश्‍न सोडवू. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीसाठी काही संस्था सकारात्मक आहेत तर काही संस्थांचा विरोध आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी शासन व संस्था यांनी चर्चेतून प्रश्‍न सोडवले पाहिजेत, असे आवाहन शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी केले.

सातारा येथील संस्था संघ, मुख्याध्यापक संघ, शैक्षणिक व्यासपीठ, ग्रंथपाल सेना व अनुकंपाधारक संघटना यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्था संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, संस्था जिल्हा अध्यक्ष अशोकराव थोरात, उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण उपस्थित होते.

सोळंकी म्हणाले, राज्यात शिक्षण संस्थांनी शिक्षण देण्याचे चांगले काम केले आहे. संस्था आणि कर्मचाऱ्यांच्या चर्चेतून समस्या सुटू शकतात. विद्यार्थी गुणवत्ता वाढ, शिक्षण निष्पत्ती, क्षमता वाढवणे, एकविसाव्या शतकात विद्यार्थी यांचा कौशल्य विकास करणे तसेच नवीन जगाला आत्मविश्‍वासाने सामोरे जाण्यासाठी आत्मविश्‍वास निर्माण करणे गरजेचे आहे, असे सांगून सोळंकी म्हणाले, विद्यार्थ्याला भविष्यात चांगला नागरिक निर्माण करण्यासाठी शाळा हे महत्वाचे ठिकाण आहे.

येत्या काळात विद्यार्थी भारतीय संस्कृती जपेल. ई-लर्निंगच्या माध्यमातून चांगले काम या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रात होईल, अशी अपेक्षा आहे. सातारा जिल्हा शैक्षणिक दृष्टीने अग्रेसर आहे. साताराने देशाला शैक्षणिक गुणवत्ता दिली आहे, तो शैक्षणिकदृष्ट्या दिशादर्शक आहे. शैक्षणिक संस्था यांना माझे सहकार्य राहील संस्थेच्या प्रश्‍नांसाठी पुन्हा एक बैठक घेण्याचे आश्‍वासन सोळंकी यांनी दिले.

अध्यक्ष नवल पाटील म्हणाले, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी खऱ्या अर्थाने या संस्था संघाची स्थापन केली. पूर्वी खेड्यात शिक्षणासाठी संस्थानी पुढाकार घेतला. आता त्यांच्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यांचे अधिकार काढून घेण्याचा डाव आहे. आयुक्तांनी आमची बाजू शासना समोर मांडावी. शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर म्हणाले, शैक्षणक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संघटनाचे सहकार्य असते. बैठका होतात चर्चेतून मार्ग निघतो. विविध उपक्रमाचे स्वागत व अंमलबजावणी संस्था करतात.

यावेळी अनुकंपाधारक संघटनेचे मोहन जगताप, विजय लोहार यांनी आयुक्त विशाल सोळंकी याना निवेदन दिले. अनुकंपा धारकांचे व ग्रंथपाल यांचे भरतीबाबत व वेतन त्रूटीबाबत चर्चा झाली. यावेळी मोहनराव जाधव, ऍड. वसंतराव फाळके, एस. टी. सुकरे, ए. आर. पाटील, टी. ए. थोरात, ग्रंथपाल सेनेचे सुरेश रोकडे, सी. के. सावंत, मोहनराव जगताप, एस. एम. शेख आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.