चौघांवर पुण्यात गुन्हा दाखल; सातार्यातील वकील कमलेश पिसाळ यांचा समावेश
सातारा (प्रतिनिधी) – सातारा येथील औंध संस्थानाच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनीधींची पुण्यात फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्या वकिलासह चौघांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या सदाशिव पेठेतील प्रॉपर्टीचे बनावट दस्तऐवज तयार करुन ही फसवणूक करण्यात आली. यातील तिघा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहे.
याप्रकरणी, शशी शंकर पोडवाल (वय.51, रा. आळंदी रोड येरवडा), आसिफ जलिल खान (वय.61, रा. मार्केटयार्ड), अन्वर युनूस खान पठाण (वय.54, रा. गोखलेनगर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर अॅडव्होकेट कमलेश पिसाळ (रा.केसरकर पेठ, सातारा) याच्यासह चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गायत्रीदेवीचे स्वीय सहाय्यक बलराज अरुण वाडेकर (वय.37, रा. गुरूवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
बनावट दस्तावेज तयार करुन आरोपी पंतप्रतिनिधींची प्रॉपर्टी विकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र फिर्यादी हे प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी पाहत असताना, त्यांना हा प्रकार समजला. त्यांनी याबाबत जाऊन पाहणी केली असता, ती पंतप्रतिनिधींची असल्याचे समोर आले. त्यानुसार फिर्यादींनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली होती. दरम्यान, दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून आरोपींना अटक केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यवसायिक आहेत. तसेच, गायत्रीदेवी यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काम पहातात. सर्व्हे, नंबर 458/1 टिळकरोड सदाशिव पेठ, पुणे येथील मिळकतीबद्दल आरोपी शशी पोडवाल याने प्रॉपर्टीचा पोट भाडेकरु आसिफ व अन्वर यांच्याशी संगनमत करून प्रॉपर्टीचा बनावट नोटराईज समझोता करारनामा केला.
त्यानंतर गायत्रीदेवी व त्यांच्या मुली चारुशिला व कु.हर्षिता पंतप्रतिनिधी यांची बनावट फोटो लावून त्यांच्या खोट्या सह्या केल्या. दरम्यान नोटराईज समझोता करारनामा खोटे आहेत हे गायत्रीदेवींचे वकील कमलेश पिसाळ यांना माहिती असताना देखील चौघांनी संगनमत करत बनावट दस्ताऐवज तयार करून तो खरा आहे हे भासवत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत तिघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत.