राजकारणावरील चर्चेस विरोध केल्यामुळे कोयत्याने वार

मध्यरात्री घराजवळच कोण होणार विजयी याबाबत मोठ्याने मंथन

पिंपरी – काहीजण घराच्या शेजारीच उभे राहून राजकारणावर जोरदार चर्चा करत होते. मध्यरात्री आमच्या घराजवळ उभे राहून कोण निवडून येणार? याची चर्चा करु नका, असे तिथे राहणाऱ्या महिलेने यांना सांगितले. यामुळे चिडलेल्या आरोपींनी दांपत्यास बेदम मारहाण केली, तर पतीच्या डोक्‍यात कोयता घालून जखमी केले. ही घटना पिंपरी येथे घडली.

गौतम विष्णू रोकडे (वय 45), प्रवीण भीमराव वडमारे (वय 40), सुनील विष्णू रोकडे (वय 38), संगीता प्रकाश गायकवाड (वय 45, सर्व रा. भीमनगर, भाजी मंडई जवळ, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. शीतल सचिन सुर्वे (वय 30) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास आरोपी फिर्यादी शीतल यांच्या घराबाहेर उभे राहून पिंपरीतून कोण निवडून येणार याबाबत चर्चा करीत होते. यामुळे घराच्या बाजूला चर्चा करू नका, असे फिर्यादी यांनी सांगितले. या कारणावरून संतापलेल्या आरोपींनी फिर्यादी यांच्याशी झटापट केली. त्यावेळी शीतल यांच्या उजच्या हाताच्या बोटाला मार लागला.

त्यानंतर आलेल्या शीतल यांच्या पतीने याबाबत विचारणा केली असता आरोपींनी त्यांच्या पतीला शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. त्यानंतर डोक्‍यात कोयता मारून गंभीर जखमी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.