पोलीस उपनिरीक्षकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे – कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला सरकारी कामात अडथळा आणत गळा आळवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात आणखी एकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

विशाल शंकर चव्हाण (वय 27, रा. धनकवडी, मूळ. रामापूर, ता. पाटण, जि. सातारा) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी अनिकेत बाळासाहेब कांबळे (वय 24, रा. बिबवेवाडी), सोमनाथ उत्तम कसबे (वय 29, रा. सहकारनगर), प्रवीण अरूण वाघमारे (वय 26, रा. सहकारनगर), सचिन बाळू साठे (वय 26, रा पद्मावती) आणि सूरज भीमा भिसे (वय 26, रा. मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत सहकारनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक लुईस ऍन्थोनी मकासरे (वय 56) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 7 जानेवारी रोजी रात्री 11.20 च्या सुमारास तळजाई वसाहत येथील महात्मा गांधी चौक येथे घडली. घटनेवेळी फिर्यादी कर्तव्यावर होते. त्यावेळी काही मुले मोटार सायकलवरून स्टंटबाजी करून आरडा-ओरड करत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यावेळी ते पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी चालले होते. त्यावेळी मोटार सायकली थांबवून, असे का करता, अशी विचारणा त्यांनी गोंधळ घालणाऱ्यांना केली. त्यावेळी सर्वजण गाडीवरून खाली उतरले. गळा आवळून फिर्यादींना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसांनी चव्हाण याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी अधिक तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.