तोफखाना पोलीस ठाण्यातच एकास जीवे मारण्याचा प्रयत्न

किरकोळ वादातून केले ब्लेडने वार

नगर – शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच एकावर ब्लेडने हल्ला केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. याबाबत एका जणाच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी राजू मुरलीधर काळोखे याला ताब्यात घेतले आहे.

या हल्ल्यात साहेबराव काते हे जखमी झाले. त्यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, शुक्रवारी (दि.2) रोजी दुपारी संशयित आरोपी काळोखे आणि काते यांच्यात वाद झाले होते. किरकोळ वादातून झालेल्या भांडणाचे शुक्रवारी तोफखाना पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, शनिवारी तोफखाना पोलिसांनी दोघांनाही प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. ठाण्यात आल्यानंतर दोघांमधील वाद आणखी चिघळला व त्यानंतर कोते याच्यावर काळोखे याने पोलिसांसमोरच हल्ला चढविला.

विशेष म्हणजे तोफखाना पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार कक्षातच ही घटना घडली.  वार करणारा काळोखे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे तोफखाना पोलीस ठाण्यात एकच गोंधळ उडाला होता. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे अधिक तपास करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.