पुणे(प्रतिनिधी) : कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या आवारात शिरलेल्या चोरट्यांनी चंदनाची झाडे कापून नेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील सुरक्षारक्षक सतीश हुलगे यांनी भारती विद्याापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मंगळवारी मध्यरात्री चोरटे प्राणीसंग्रहालयाच्या आवारात शिरले. आवारातील चंदनाची झाडे कापून नेण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याचे उघडकीस आले.
प्राणीसंग्रहालयाचे आवार विस्तीर्ण आहे. यापूर्वी प्राणीसंग्रहालयाच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्यात आली होती. पोलीस हवालदार राजेंद्र कचरे तपास करत आहेत.
तीन दिवसांपूर्वी कोंढव्यातील एनआयबीएम संस्थेच्या आवारातून चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना उघडकीस आली होती.