नवी दिल्ली, – बुधवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या निवासस्थानी घुसखोरी करण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केल्याने सुरक्षा यंत्रणांची आज चांगलीच तारांबळ उडाली. या प्रकरणात सुरक्षा यंत्रणांनी बेंगळुरू येथील एका व्यक्तीला अटक केली आहे.
ही घटना सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. ही व्यक्ती लाल-रंगाच्या एसयूव्ही गाडीतून आला होता. त्याने उच्च सुरक्षा असलेल्या मध्य दिल्लीतील डोवाल यांच्या निवासस्थानाच्या गेटमधून जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
एंट्री गेटच्या बाहेर कार अडवण्यात आली आणि डोवाल यांच्या घराचे रक्षण करणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी त्या व्यक्तीला पकडले. अजित डोवाल यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे. ही घटना घडली त्यावेळी डोवाल हे घरातच होते.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव शंतनू रेड्डी असे असून तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. तो बंगळुरू येथील रहिवासी आहे. तो जी गाडी घेऊन तेथे आला होता ती गाडी त्याने नोएडा येथून भाड्याने घेतली होती असे पोलिसांनी सांगितले. या व्यक्तीकडे पोलिसांनी चौकशी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तो उत्तरे देण्याच्या स्थितीत नव्हता. त्याचे मानसिक संतुलन पूर्ण बिघडले असल्याचे लक्षात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.