राजगुरूनगरमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न

राजगुरुनगर (पुणे)- खेड तालुक्‍यातील राजगुरुनगर शहरातील पाबळ रोड येथे आयडीबीआय या बॅंकेच्या शाखेचे एटीएम चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र मशीन न फुटल्यामुळे संपुर्ण रक्कम सुरक्षित राहिली. राजगुरुनगर शहरात एटीएम फोडण्याची ही पहिलीच घटना असून, यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी (दि. 22) पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास घडली.

 

पाबळरोड येथे महाराज चौकात आयडीबीआय बॅंकेची शाखा आहे. या शाखेलगत एटीएम केंद्र आहे. ग्राहकांच्या सेवेसाठी या एटीएमचा कक्ष 24 तास खुला ठेवण्यात येतो. या एटीएमला सुरक्षारक्षक नसल्यामुळे रविवारी (दि. 22) पहाटे चोरट्यांनी एटीएम मशीनला स्कार्पिओ या चारचाकी गाडीला लोखंडी तारेने बांधुन ओढून फोडण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी झाला. यात एटीएम मशीनचे नुकसान झाले आहे.

 

दरवाजाच्या काचा फुटल्या आहेत. या एटीएम मशीनमध्ये सुमारे 12 लाख रुपये रक्कम होती. एटीएम फोडण्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. चोरट्यांना मशीन फोडण्यात यश न आल्याने एटीएममधील रक्कम सुरक्षित राहिली. चोरटा एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत असला तरी तोंडाला स्कार्फ बांधला असल्याने ओळख पटवणे कठीण झाले आहे. आयडीबीआय व्यवस्थापनाला माहिती मिळताच त्यांनी खेड पोलीस ठाण्याला माहिती दिली. खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश गुरव, सहायक पोलीस निरीक्षक भारत भोसले, संदीप भापकर, डीबी पथकातील स्वप्निल गाढवे, सचिन जतकर, निखिल गिरीगोसावी यांनी घटनास्थळी जाऊन चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.