सोक्षमोक्ष – हल्ले-प्रतिहल्ले : लष्कराचे; राजकीय पक्षांचेही!

-हेमंत देसाई

वास्तविक भारत व पाकिस्तान या उभय देशांत युद्ध वगैरे काहीही सुरू नसून, सध्या मर्यादित हल्ले-प्रतिहल्ले आहेत. मात्र, युद्धज्वर वाढवण्यात भाजपला अधिक रस आहे. तरीही राज ठाकरे यांच्यासारख्या विरोधी पक्षातील नेत्यांनीही सध्याच्या वातावरणात अधिक जबाबदारीने बोलण्याची गरज आहे. मात्र, विरोधी पक्षांनी हवाई हल्ल्यांबद्दलची माहिती मागितली, तर तो देशद्रोह ठरतो, असेही मानायचे कारण नाही. जेव्हा भारत कारवाई करत होता, तेव्हा विरोधी पक्ष बैठका घेऊन राजकारण करत होते, असा आरोप मोदींनी केला आहे. वास्तविक विरोधी पक्षांनी एकमुखाने सरकारमागे राहण्याची भूमिका घेतली होती.

पुलवामा हल्ल्याचा भारताने यथायोग्य बदला घेतल्यानंतर, अपेक्षेप्रमाणे त्याबद्दलचे राजकारण सुरू झाले आहे. “भारताकडे राफेल विमाने असती, तर देशाने बरीच मोठी कामगिरी केली असती. या व्यवहाराबाबत इगो पॉलिटिक्‍समुळे देशाचे नुकसान झाले आहे’, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना केले.वास्तविक दुसऱ्यांच्या इगोबद्दल प्रधानसेवकाने बोलणे म्हणजे फारच झाले. “चौकीदार चौकन्ना है’, असे जरी मोदी म्हणत असले, तरी “राफेल’बाबतचे संशयाचे मळभ अद्याप दूर झालेले नाही.

प्रशांत भूषण, अरुण शौरी व यशवंत सिन्हा यांनी या प्रकरणाचा न्यायालयीन पाठपुरावा सुरूच ठेवलेला आहे. राफेल विमानांना कॉंग्रेससह कोणाचाही विरोध नसून त्यातील संशयास्पद व्यवहारांबाबत शंका आहे. बोफोर्समधील भ्रष्टाचाराबद्दल भाजपने मोहीम उघडली होती. परंतु “बोफोर्सच्याच तोफा कारगिलमध्ये उपयोगास आल्या’, असे कॉंग्रेसतर्फे सांगितले जात आहे. त्या तोफांना कोणाचा विरोध नव्हता, तर त्यातील व्यवहारांमध्ये झालेल्या घोटाळ्याला होता, हेही लक्षात घ्यावे लागेल.

राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्‌घाटन करताना मोदी यांनी “कॉंग्रेसने एकाच कुटुंबाचा विचार केला; आम्ही देशाचा विचार करत आहोत, सत्तर वर्षांत कॉंग्रेसला “वॉर मेमोरियल’ करावे, असे वाटले नाही,’ अशी टीका केली. वास्तविक या 70 वर्षांत वाजपेयी सरकारचाही कालखंड येतो. तेव्हा मोदींची टीका त्यांनाही लागू होतेच. तसेच दिल्लीमध्ये “अमर जवान ज्योती’ हे स्मारक आहे. तेथे दरवर्षी मानवंदनाही दिली जाते. चंदीगड व अन्यत्रही अशी स्मारके आहेत आणि तेथे शहीद जवानांना आदरांजली वाहिली जाते. त्यामुळे “पूर्वी सैनिकांसाठी काहीच करण्यात आले नाही; आणि जे काही केले, ते आम्हीच केले’, असे म्हणणे हा शुद्ध खोटारडेपणा आहे.

तसेच युद्ध स्मारकाच्या कार्यक्रमात कॉंग्रेसवर टीका करण्याचे काहीएक कारण नव्हते. त्या ठिकाणचे पावित्र्य जपण्याची आवश्‍यकता होती. जगात काही देशांमध्ये “शहीद जवानांच्या स्मारकांच्या ठिकाणी राजकारण केले जाऊ नये’, असा नियमच आहे. या सोहळ्यास पंतप्रधानांनी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांनाही आमंत्रण दिले नव्हते. वास्तविक राष्ट्रपतींच्या अधिपत्याखाली लष्कर येते. तेव्हा एवढेही पथ्य पाळले गेले नाही.

भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांची माहिती देण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलावण्यात आले. पण या बैठकीस स्वतः पंतप्रधान गेले नाहीत. ही जबाबदारी त्यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर सोपवली. आपण इतरांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहोत, अशीच मोदी यांची भावना आहे. “वर्ष 2019 ची लोकसभा निवडणूक म्हणजे “पनिपतचे तिसरे युद्ध’ आहे आणि त्यात मोदींना 300 जागा मिळतील’, असे भाकित संघ विचाराच्या एका स्तंभलेखकाने केले. तर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते येडियुरप्पा यांनी “या हल्ल्याचा भाजपला थेट राजकीय लाभ मिळणार असल्याचे’ सांगितले. दिल्ली भाजप नेते व अभिनेते मनोज तिवारी हे तर तणावाच्या काळात नाचगाण्यात मश्‍गूल होते. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर “आपल्या सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींबद्दल आत्मपरीक्षण केले पहिजे’, असे मत जम्मू-काश्‍मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी व्यक्त केले. त्यामुळे भाजपचा काश्‍मीरसंबंधातील चिंतन गट अक्षरशः खवळला.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी अड्डे उद्‌ध्वस्त केले. त्यात मदरसा तालीम-उल-कुराणच्या चार इमारतींचे नुकसान झाले आहे, असे सरकारच्याच अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु “गोपनीय माहितीच्या नियमामुळे नेमके किती दहशतवादी ठार झाले, ते सध्या सांगता येणे शक्‍य नाही’, असे सूत्रांनी सांगितले. परंतु सुरुवातीला मात्र सूत्रांचाच हवाला देऊन, 300 ते 600 अतिरेकी ठार झाल्याचा दावा करण्यात आला होता. ही “सूत्रे’ कोणती होती, ते कळायला मार्ग नाही. गुप्तचर यंत्रणांकडे सिंथेटिक अपर्चर रडारच्या साह्याने घेण्यात आलेली छायाचित्रे पुरावे म्हणून उपलब्ध आहेत. लक्ष्य करण्यात आलेल्या चार इमारतींना मिराज-2000 ने पाच एस-2000 प्रिसिजन गायडेड ऍम्युनिशनच्या साह्याने उद्‌ध्वस्त करण्यात आल्याचे छायाचित्रात स्पष्ट दिसत आहे.

हल्ला करण्यात आलेली जागा पाक लष्कराने सील केली असल्याने, भारतीय गुप्तचर यंत्रणांसाठी कोणतीही माहिती मिळवणे अवघड झाले आहे. त्यामुळे हवाई हल्ल्यात मारल्या गेलेल्या अतिरेक्‍यांची संख्या निश्‍चित सांगता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु या गोष्टीकडे दुर्लक्ष करत सत्ताधारी भाजपचे नेते देशभर ठिकठिकाणी भरमसाठ दावे करून, राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

अमेरिका, चीन यासारखे बडे देश भारताच्या बाजूने उभे राहिले असून, त्यांनी आणलेल्या दडपणामुळेच पाकिस्तानच्या तावडीत सापडलेल्या भारतीय वायुदलातील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची सुटका होऊ शकली. या सुटकेचे संयुक्‍त राष्ट्रांनी स्वागत केले असून, “दोन्ही देशांनी हीच सकारात्मकता पुढे चालू ठेवून, रचनात्मक संवाद साधावा’, असे आवाहन केले आहे. भारत व पाकिस्तानने “समझोता एक्‍स्प्रेस’च्या फेऱ्या सुरू करण्याचा निर्णयही घेतला आहे. भारत-पाकमधील तणाव निवळला आहे, अशे मत आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्त झाले असले, तरीदेखील युद्ध सुरू असल्याचा दावा भाजपच्या एका प्रवक्‍त्याने नुकताच केला.

कोरियातील युद्ध संपल्यावर चीन व्हिएतनामला लष्करी मदत देऊ लागला. व्हिएतकॉंगला पर्याय निर्माण झाला नव्हता आणि फ्रेंचांना सतत माघार घ्यावी लागत होती. वर्ष 1946 ते 1954 पर्यंत अमेरिकेने 200 कोटी डॉलर्स एवढी लष्करी मदत व्हिएतनाम युद्धासाठी फ्रेंचांना दिली होती. मात्र, व्हिएतकॉंगने फ्रेंचांच्या सैन्यावर जोरदार हल्ले केले व त्यास कोंडीत पकडले. पुढे अमेरिका सर्वशक्‍तिनिशी व्हिएतनाम युद्धात उतरली. त्यात तिने 168 अब्ज डॉलर्स खर्च केले. या युद्धात अमेरिकेचा पराभव झालाच; परंतु तिच्या अर्थव्यवस्थेवरदेखील अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला. त्यातून आंतरराष्ट्रीय चलन संकट निर्माण झाले आणि महागाईच्या राक्षसाने जगाला घेरले. अमेरिकेतील विरोधी पक्ष व माध्यमांनी यासंबंधी सरकारला रोखठोक सवाल केले. असे सवाल विचारणे हा देशद्रोह मानला गेला नाही.

भारतातील आगामी निवडणुका युद्ध, राष्ट्रवाद, दहशतवाद, सुरक्षा याच मुद्द्यांवर लढल्या जाव्यात, असा भाजपचा प्रयत्न आहे. तर ग्रामीण उध्वस्तता, बेरोजगारी या मुद्द्यांवर निवडणूक लढवली जावी, अशी विरोधकांची धडपड असेल. तोपर्यंत हे हल्ले-प्रतिहल्ले राजकारणाचा विषय बनणारच!

Leave A Reply

Your email address will not be published.