इस्तंबुल (तुर्की) – तुर्कीमध्ये एका अंत्यविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मुख्य विरोधी पक्षाच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. कुर्दिश दहशतवाद्यांच्या विरोधात लढताना मरण पावलेल्या सैनिकाच्या अंत्यविधीला उपस्थित असताना रिपब्लिकन पीपल्स पार्टीचे प्रमुख केमाल किलीक्दारोग्लु यांच्यावर हल्ला झाला. त्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांनी त्यांना जवळच्या घारामध्ये नेले असे अनादोलु या सरकारी वृत्तवाहिनीने सांगितले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाला. किलीक्दारोग्लु यांना धक्काबुक्की करत एक जमाव त्यांच्या दिशेने येत असताना यामध्ये स्पष्ट दिसत आहे. या जमावाने प्रथम किलीक्दारोग्लु यांच्या विरोधात निदर्शने केली आणि नंतर त्यांना मारण्याच्या हेतूने हल्ला करण्यात आला.
गेल्या महिन्यात इस्तंबुलच्या महापौरांच्या निवडणूकीत रिपब्लिकन पीपल्स पार्टीने विजय मिळवला. हा विजय अध्यक्ष इर्डोगन यांच्या विरोधी पक्षाच्या बाजूने लागल्यानेच हा हल्ला झाला असावा, असा अंदाज आहे.