देशातील प्रत्येक शेतकऱ्याच्या आत्म्यावर हल्ला – राहुल गांधी

चंडीगढ – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी नव्या कृषी कायद्यांवरून मोदी सरकारवरील शाब्दिक हल्ल्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. ते कायदे म्हणजे देशातील प्रत्येक शेतकऱ्याच्या आत्म्यावरील हल्ला असल्याचे त्यांनी आता म्हटले आहे.

कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी राहुल यांनी काही दिवसांपूर्वी पंजाब आणि हरियाणात ट्रॅक्‍टर रॅली काढल्या. त्याचा संदर्भ देऊन राहुल यांनी पंजाबमधील एका व्हर्च्युअल कार्यक्रमात बोलताना मोदी सरकारला लक्ष्य केले. त्या सरकारचे कृषी कायदे देशाचा पाया कमजोर करणारे आहेत.

पायाच कमजोर झाला तर देश दुबळा बनेल. कृषी कायदे शेतकऱ्यांच्या आणि मजुरांच्या हिताचे असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. तसे असेल तर सरकारने कायदे मंजूर करण्याआधी त्यावर संसदेत चर्चा का होऊ दिली नाही? सरकार चर्चेला का घाबरले? संपूर्ण देशाने संसदेतील चर्चा पाहिली असती आणि कृषी कायद्यांबाबत निर्णय घेतला असता, असे ते म्हणाले. शेतकरी आणि विरोधी पक्षांकडून होणाऱ्या विरोधामुळे कृषी कायदे वादग्रस्त ठरले आहेत. त्यावरून कॉंग्रेसने आणि प्रामुख्याने राहुल यांनी सरकारवर टीकेची झोड कायम ठेवली आहे.

भूक निर्देशांकावरूनही टीकास्त्र
जागतिक भूक निर्देशांकावरून भारतातील गंभीर स्थिती समोर आली आहे. त्याचा संदर्भ देऊन राहुल यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. सरकार केवळ आपल्या काही खास मित्रांचे खिसे भरण्यात व्यस्त आहे. त्यामुळे देशातील गरिबाला भुकेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे, असे ट्‌विट त्यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.