वॉशिंग्टन – अमेरिकेत कॅलिफोनिर्या येथील एका गुरूद्वाराच्या पुजाऱ्यावर गुरूवारी रात्री हल्ला करण्याचा प्रकार घडला आहे. वांशिक द्वेषातूनच हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गुरूद्वाराच्या कॅम्पस मध्ये तेथील पुजारी अमरजितसिंग यांचे घर आहे. हल्लेखोराने घराची खिडकी फोडून आत प्रवेश केला. आणि अमरजितसिंग यांच्यावर त्याने हल्ला चढवला. तुझ्या देशात परत निघून जा अशी धमकीही त्याने दिली. धार्मिक द्वेषातूनच हा प्रकार घडल्याचे या गुरूद्वाराच्या काहीं सदस्यांचे म्हणणे आहे.
गेल्या दोन वर्षांपासून अशा प्रकारच्या घटना अमेरिकेत वाढल्या आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान कॉंग्रेसमन जोश हार्डर यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. अशा एखाददुसऱ्या घटनांमुळे शिख बांधवांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. ज्या भावनेतून हा प्रकार करण्यात आला ती अमेरिकेची वृत्ती नाही. येथे सर्वच धर्मियांना त्यांच्या प्रथेनुसार धर्माचे पालन करण्याचे पुर्ण स्वातंत्र्य आहे असेही त्यांनी म्हटले आहे. एकाही अल्पसंख्याकावर झालेला हल्ला हा अमेरिकेतील साऱ्याच अल्पसंख्याकांवरील हल्ला मानला जाईल आणि त्यानुसार संबंधीतावर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.