बछड्याच्या मृत्यूने मादीचा नागरिकांवर हल्ला

संग्रहित छायाचित्र...

धामणी येथील घटना; भीतिदायक वातावरण

ढेबेवाडी  – तीन दिवसांपूर्वी धामणी ता. पाटण येथे भावके वस्तीजवळ बिबट्याचा सव्वा वर्षाचा बछड्या अज्ञात वाहनाच्या धडकेत मरण पावला. यावेळी त्याच्यासोबत असणारी त्याची आई मादी बिबट्या मात्र आपल्या बछड्याच्या वियोगाने व्याकुळ झाली आहे.

रात्रीच्या वेळेस अनेकांना तिचा आक्रोश कानावर पडला आहे. तसेच ही मादी नागरिकांवर हल्ला करू लागली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. केतन झेंडे याच्यावर घटनेदिवशीच हल्ला झाला होता. त्यात तो जखमी झाला. तर दिलीप सावंत भर वस्तीत बिबट्या दिसल्याचे त्यांनी सांगितले.

धामणी परिसरात ही घटना घडली होती. वनरक्षकांनी सदर ठिकाणी भेट देऊन बिबट्याच्या बछड्यास ताब्यात घेतले होते. मात्र या घटनेनंतर मादी बिबट्या धामणी परिसरात सतत फिरत असल्याचे ग्रामस्थांना दिसत आहे. अनेकवेळा घटनास्थळी येऊन बछड्याचा शोध घेताना दिसते. यावेळी रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवरही हल्ले ती करत आहे.

त्यामुळे रात्रीचा प्रवास भितीदायक बनला आहे. या मादीने भरवस्तीत येऊन केतन झेंडे यांच्यावर हल्ला केला होता. त्यात ते जखमी झाले आहेत. या घटनेच्या दुसऱ्यादिवशी दिलीप सावंत हॉटेलवाले यांनाही सदर बिबट्या गावात फिरताना दिसला आहे. वनविभागाने याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. वन विभागाकडून रात्रगस्तही घालण्यात येत आहे. मात्र, सापळा लावण्यासाठी वरिष्ठांकडून अजून मंजुरी मिळाली नसल्याचे अमृत पन्हाळे यांनी सांगितले.

यापूर्वी वाल्मिकी पठारावरील अनेक गावे वाड्यावस्त्या तसेच शिद्रुकवाडी, खळे, काढणे, ढेबेवाडी वांग नदी संगम पूल, मदनेवस्ती (जानुगडेवाडी), मानेगाव आदी ठिकाणी बिबट्याने हल्ला करून शेळ्या, कुत्री फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. नोकरदार वर्गाला सकाळी लवकर घराबाहेर पडावे लागते. तसेच रात्री येण्यासही उशीर होतो. बिबट्याच्या भितीमुळे अनेकांनी कामावर जाणे बंद केले आहे. त्यामुळे वन विभागाने तात्काळ सापळा लावावा, अशी मागणी वंदना आचरे यांनी केली आहे.

काळगाव-धामणी परिसरात या बिबट्याच्या दहशतीसह गवा रेडे, डुकरे, वानरे, मोर यांच्यामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीने जनता त्रस्त आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातून उरलेल्या पिकांचेही वन्य प्राण्यांकडून नुकसान केले जात आहे. त्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा.

ज्ञानदेव आचरे, प्रगतिशील शेतकरी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here