विरार – विरारमधील एका बिल्डरची धारदार शस्त्राने वार करत हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. श्रावण सोमवार निमित्त मंदिरात दर्शनासाठी जात असताना हा प्रकार घडला आहे. या घटनेचा माहिती मिळताच विरार पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
निशांत कदम, वय 31 असे खून झालेल्या बिल्डरचे नाव आहे. विरारमधील पूर्वेतील सहकार नगरमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांची एन के एन्टरप्राइजेस नावाची बांधकाम कंपनी आहे. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास कदम शंकराच्या मंदिरात जाण्यासाठी आपल्या दुचाकीनं निघाले होते.दरम्यान गांधी चौक परिसरात काही आरोपी मृत कदम यांची वाट पाहात दबा धरून बसले होते. निशांत कदम गांधी चौक परिसरात पोहोचताच दबा धरुन बसलेल्या आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात कदम यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान, सहकार नगर येथील एका जागेवरून कदम यांचे काही जणांशी वाद असल्याची माहिती मृत बिल्डर कदम यांच्या भावाने पोलिसांना दिली आहे. या घटनेचा पुढील तपास विरार पोलीस करत आहेत.